3 जिल्ह्यातील 17 गंभीर गुन्ह्यात फरारी आरोपीला एलसीबीकडून अटक

पुुणे : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) – पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने मोटरसायकल चोरीच्या पुणे जिल्ह्यातील १२, पुणे शहर आयुक्तालय २, पिंपरी चिंचवड आयुक्तालय १, सातारा जिल्हा १, सोलापूर जिल्हा १, अशा एकूण १७ गुन्ह्यांमध्ये फरारी असलेला अट्टल गुन्हेगार अमोल उर्फ लखन विलास देशमुख वय २९ (रा. यवत ता. दौंड जि. पुणे सध्या रा.खंडोबानगर, बारामती जि. पुणे) यास बारामती मोरगाव रोड, ढवाणवस्ती येथून ताब्यात घेतले आहे. याबाबत स्थानिक गुन्हे शाखा LCB चे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली आहे.

पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक संदिप पाटील यांनी आगामी गणेशोत्सवाचे अनुषंगाने रेकॉर्डवरील वॉन्टेड असणारे फरार आरोपी पकडण्यासाठी विशेष मोहिम राबवत गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना आदेश दिलेले आहेत. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक गणेश क्षिरसागर, महेश गायकवाड, निलेश कदम, सुभाष राऊत, गुरु गायकवाड यांचे पथक नेमण्यात आलेले होते. सदर पथकाने शिक्रापूर, दौंड, लोणीकाळभोर, लोणीकंद, वडगाव निंबाळकर, जेजूरी, वानवडी, हडपसर, चाकण, फलटण जि.सातारा, अकलूज जि.सोलापूर या पोलीस स्टेशनचे हद्दीतील मोटरसायकल चोरीच्या एकूण १७ गुन्ह्यांमध्ये दोन वर्षापासून फरारी असलेला रेकॉर्डवरील आरोपी अमोल उर्फ लखन विलास देशमुख वय २९ वर्षे रा.यवत ता.दौंड जि. पुणे याची माहिती काढली असता, पोलीस त्याचा शोध घेत असल्याचे त्याला समजल्याने त्याने यवत येथील घर बदलून कुरकुंभ, दौंड, पणदरे त्यानंतर बारामती येथे राहण्यास गेला होता.

पोलीसांनी त्या पत्त्यावर जावून त्याची माहिती काढली परंतु तो वारंवार पत्ते बदलत असल्याने व घरी क्वचितच येत असल्याने त्याची माहिती मिळत नव्हती. तो सध्या बारामती येथे राहत असून तो ट्रकवर कर्नाटक, बेंगलोर येथे ड्रायव्हर म्हणून काम करीत असल्याची पोलीस पथकाला माहिती मिळाली. सदर आरोपी लखन देशमुख हा दिनांक २ ऑगस्ट २०१९ रोजी गणेशोत्सवासाठी बारामती येथे येणार असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाल्याने गुन्हे शाखेच्या पथकाने बारामती खंडोबानगर परिसरात वेशांतर करुन सापळा रचला होता. परंतु आरोपीस पोलीसांची चाहूल लागलेने तो मोटरसायकलवर पळून जाऊ लागला असताना पोलिसांनी सिनेस्टाइल पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले. आरोपीने चोरलेल्या मोटरसायकली यापूर्वीच त्याचे साथीदाराकडून हस्तगत केलेल्या आहेत.

आरोपी लखन देशमुख याचेवर यापूर्वी पुणे जिल्ह्यात यवत, बारामती शहर, बारामती तालुका या पोलीस स्टेशनला जबरी चोरी, खंडणी, पळवून नेणे, चोरी, मारामारी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. सन २०१३ मध्ये पुणे-सोलापूर रोडला वरवंड येथे त्याने ३ साथीदारांचे मदतीने तांदळाचा भरलेल्या ट्रक चालकाला मारहाण करून जबरदस्तीने चोरून नेला होता. सदर आरोपीने फरारी असताना आणखीन गुन्हे केल्याची शक्यता असून त्यादृष्टीने तपास चालू आहे. आरोपीस पुढील कारवाईसाठी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like