एक्सचेंज एजंटच्या डोळ्यावर पेपर स्प्रे मारुन अमेरिकन डॉलर चोरणारा गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अमेरिकन डॉलर पाहिजे असं सांगून फॉरेन एक्सचेंज कर्मचाऱ्याकडून जबरदस्तीने डॉलरची चोरी करणाऱ्यास गुन्हे शाखा युनिट-2 च्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून 12 हजार अमेरिकन डॉलर जप्त करण्यात आले आहे. त्याने पुण्याबरोबरच हैदराबाद येथे देखील डॉलरच्या नावाखाली फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे. गुन्हे शाखा युनिट-2 ने त्याला हैदराबाद येथून अटक केली आहे. राहूल किरण गाटीया (वय-31 रा. नेपीयन सी रोड, शांतीनगर, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीला हैदराबाद येथे सपाळा रचून अटक केली.

पुण्यातील कोरेगाव पार्क आणि येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये नोव्हेंबर 2019 मध्ये डॉलरच्या नावाने फसवणुकीच्या घटना घडल्या होत्या. या गुन्ह्यांचा तपास करत असताना अशाच प्रकारच्या घटना हैदराबादमध्ये देखील घडल्या असल्याची माहिती युनिट-2 चे प्रभारी अधिकारी महेंद्र जगताप यांना समजली. त्यांनी हैदराबाद पोलिसांकडून माहिती घेतली असता पुण्यात आणि हैदराबादमध्ये अशा प्रकारची फसवणूक करणारा एकच व्यक्ती असल्याचे समोर आले.

आरोपीने बनावट नावाने सर्व्हिस अपार्टमेंट बुक करत होता. त्यानंर फॉरेन एक्सचेंजमध्ये 5 ते 7 हजार अमेरिकन डॉलरची मागणी करून त्यांना आपल्या सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये बोलावत होता. पैसे मोजण्याच्या बहाण्याने तो एक्सचेंज एजंटच्या डोळ्यावर पेपर स्प्रे मारुन किंवा धक्का देऊन खोलीला बाहेरून कडी लावून पसार होत होता. आरोपी अशा प्रकारचा गुन्हा पुन्हा करेन या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हैदराबाद येथील फॉरेन एक्सचेंजच्या अधिकाऱ्यांना सुचना दिल्या होत्या.

आरोपीने हैदराबादमध्ये पुन्हा फोनवरून एका फॉरेन एक्सचेंजमधून 7 हजार डॉलरची मागणी केली. तसेच संबंधित व्यक्तीला सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये डिलीव्हरी देण्यास सांगितले. त्यावेळी हैदराबाद पोलिसांनी आरोपी राहुल गाटीयाला सापळा रचून अटक केली. त्यानंतर आरोपीला कोरेगाव पार्क येथील गुन्ह्यात वर्ग करुन ताब्यात देण्यात आले. ही कारवाई युनिट-2 चे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, सहायक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव, पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह शेळके, सहाय्यक पोलीस फौजदार यशवंत आंब्रे, संजय दळवी, पोलीस नाईक अतुल गायकवाड, चेतन गोरे, स्वप्नील कांबळे, पोलीस शिपाई कादीर शेख, विवेक जाधव, मितेश चोरमोले यांनी केली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/