Pune : वाहन चालकांना धमकावत लुटमार करणार्‍याला अटक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पोलीस असल्याचे सांगत पादचारी आणि वाहनचालकांना धमकावून लूटमार करणाऱ्या चोरट्याला विमानतळ पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून 6 गुन्हे उघडकीस आणत ४ लाख २६ हजारांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
अबालू जाफर इराणी (वय ४५,रा. इराणी वस्ती, शिवाजीनगर रेल्वे स्थानकाजवळ) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

शहरात घरफोड्यासोबतच धमकावून लुटीच्या घटना देखील घडत आहेत. इराणी हा पोलीस असल्याचे सांगत पादचारी नागरिक व वाहनचालकांना अडवत होता. तर त्यांना धमकावून त्यांच्याकडील किंमती ऐवज पळवत होता. विमानतळ पोलिसांचे पथक गस्त घालत असताना सराइत चोरटा इराणी विमाननगर भागात थांबल्याची माहिती पोलीस हवालदार अशोक आटोळे यांना मिळाली. त्यानुसार सापळा लावून त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. यापूर्वी शहरात अशाच प्रकारचे गुन्हे केले होते. नाशिक आणि सातारा येथे देखील नागरिकांना फसविले आहे.

पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, गुन्हे शाखेचे निरीक्षक बळवंत मांडगे, सहाय्यक निरीक्षक मुजावर, अविनाश शेवाळे, मोहन काळे, रमेश लोहकरे, विशाल गाडे, संजय आढारी यांनी ही कारवाई केली.