Pune : तडीपार गुंडाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातून तडीपार करण्यात आलेला गुंड पुन्हा शहरात आल्यानंतर त्याला गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली. अभिजीत कांतीलाल पाटोळे (वय 22, गंज पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात गुन्हेगारी कारवाया कमी करण्यासोबतच टोळक्यामधील वाद होऊ नये यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगार शहरातून तडीपार करण्यात येत आहेत. अभिजीत हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर दत्तवाडी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न व इतर गुन्हे दाखल आहेत. दरम्यान त्याला दत्तवाडी पोलीसांनी तडीपार केले होते. मात्र तरीही तो शहरात आला असल्याची माहिती मिळाली. अधिक माहिती घेतल्यानंतर तो महात्मा फुले गंज पेठ सार्वजनिक रस्त्यावर असल्याचे समजले.

यानुसार वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोकाशी, दीपक मते, रोहिदास लवांडे, विल्सन डिसोझा, सचिन गायकवाड यांच्या पथकाने त्याला सापळा रचून अटक केली. त्याला पुढील कारवाईसाठी खडक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.