पुणे शहरात घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार गजाआड, 13 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे आणि पिंपरी चिचंवड शहरामध्ये घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पुणे गुन्हे शाखेच्या युनिट 1 ने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील घरफोडीचे 7 गुन्हे उघडकीस आले असून 13 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई 21 जुलै रोजी रुपीनगर निगडी येथे सापळा रचून करण्यात आली.

विक्रम विठ्ठलसिंह ठाकुर (वय-32 रा. रुपीनगर, निगडी सध्या रा. गुलबर्गा कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. आरोपीने भारती विद्यापीठ, सिंहगड रोड, हिंजवडी, वाकड, चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीचे गुन्हे केल्याचे तपासात उघड झाले आहे. त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनीट 1 मधील पोलीस कर्मचारी गजानन सोनुने यांनी घरफोडी गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार घरफोडी करण्यासाठी पुन्हा शहरात आला असल्याची माहिती मिळाली. सराईत गुन्हेगार रुपीनगर निगडी येथे आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये त्याने पुणे आणि आसपासच्या परिसरात घरफोडी केल्याचे उघडकीस आले. त्याने घरफोडीत चोरलेला मुद्देमाल आटपाडी तालुक्यातील दिघंची येथील सराफा व्यवसाय करणाऱ्या रामचंद्र उर्फ हनुमंत दगडु मोहिते (वय-31) याच्या मदतीने दागिन्यांची विल्हेवाट लावल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी मोहिते याला दिघंची येथून ताब्यात घेतले. आरोपीकडून 260 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने. 556 ग्रॅम वजनाचे दागिने, सॅमसंग कंपनीचा टीव्ही असा एकूण 12 लाख 70 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त गुन्हे बच्चन सिंग, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखा युनिट 1 चे विरीष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, हनुमंत शिंदे व पोलीस कर्मचारी गजानन सोनुने, विजेसिंग वसावे, अशोक माने, उमेश काटे, सुभाष पिंगळे, अजय जाधव, इम्रान शेख, संजय बरकडे, अनिल घाडगे, तुषार माळवदकर, महिला पोलीस शिपाई अश्विनी केकान यांनी केली.