11 वर्षांनंतर घरफोडीच्या गुन्ह्यातील फरारी जाळ्यात

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – घरफोडीच्या गुन्ह्यात फरारी असणाऱ्यास गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ११ वर्षानंतर अटक केली आहे. फरार काळात त्याने अकलूज शहरात दरोडा टाकला आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा (मोक्का)ची कारवाई केली आहे. त्यात देखील तो फरार होता.

सनी उर्फ विष्णू धर्मा कांबळे (वय ४८, रा. गांधीनगर, देहूरोड, सध्या- गायकवाड वस्ती, इंदापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. डहाणूकर कॉलनी येथील भारती बस्तवडे यांच्या फ्लॅटमध्ये २००९ मध्ये घरफोडीची घटना घडली होती. या गुन्ह्यात दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. पण, कांबळे हा फरार होता. पाहिजे असलेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी नेमलेल्या गुन्हे शाखेतील पोलिस कर्मचारी महेश निंबाळकर यांना कांबळे हा इंदापूर परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी सहायक आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांना माहिती देऊन मंगळवारी रात्री त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे तपास केल्यानंतर त्याने फेब्रुवारी २०१४ मध्ये सात ते आठ साथीदारांमार्फत अकलुज पोलिस ठाण्याच्या हद्दीत दरोड्याचा गुन्हा केल्याचे समोर आले. तसेच, या गुन्ह्यात त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्यात तो फरार होता. त्याला अटक करून पुण्यात आणण्यात आले. त्याला कोथरूड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.