पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात तरूणावर कोयत्याने सपासप वार करणार्‍याला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार करत पसार झालेल्यास वारजे माळवाडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. पोलिसांची चाहूल लागताच तो पळून जात होता. पण पोलिसांनी त्याला पाठलागकरून पकडले.

अनिल गुरुनाथ सासवे (वय 23, रा. रामनगर वारजे) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह नितीन लक्ष्मण पद्माकर (वय 20), महादेव प्रल्हाद जावळे (वय 24), मयूर रमेश कुडले (वय 19, रा. रामनगर, वारजे) अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत. याप्रकरणी रोहीत सावळाराम पोटे (वय 23, रा.कर्वेनगर) याने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

दरम्यान, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मछिन्द्र पंडीत यांनी या प्रकरणातील आरोपीस तत्काळ पकडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिस आरोपीचा शोध घेत होते. दरम्यान, अनिल सासवे हा सोमवारी नांदेड सिटी रस्त्यावर असलेल्या प्रयेजा सिटी समोर थांबला असल्याची खबर वारजे माळवाडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तेथे सापळा लावला. त्यावेळी एक गाडी संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानुसार त्यांनी गाडी चालकाला विचारणा करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तो तेथून पळाला. त्यानंतर पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन पकडले. त्यावेळी त्याने पोटे समवेत पूर्वीची भांडणे होती. त्याच्या रागातुनच त्याने साथीदाराच्या मदतीने खुनाचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक अशोक येवले, प्रतीक मोरे, बाळू गायकवाड,अमोल पायगुडे,धनंजय ताजणे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.