Pune : चोर्‍या करणार्‍या तसेच चोरीचं सोनं विकत घेणार्‍या व्यापार्‍यासह 5 जणांना अटक, मुंढवा पोलिसांची कामगिरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात विविध भागात जबरी सोन साखळी चोरणाऱ्यास सराईत गुन्हेगारास आणि ते सोने घेणाऱ्या व्यापाऱ्यासह पाच जणांना मुंढवा पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून 5 गुन्हे उघडकीस आले असून, साडे तीन लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

दीपक परशुराम माळी (वय 21, रा. हडपसर) व मुकेश सुनील साळुंखे (वय 19, रा. मुंढवा), सराफ जमीर मलंग अत्तर (वय 43, रा. वडगाव शेरी) आणि मध्यस्थी करणारे प्रमोद सुनील पाटील (वय 22) व अनिस अब्दुल रशिद शेख (वय 49) यांना अटक केली आहे.

दीपक व मुकेश सराईत गुन्हेगार आहेत. ते महिलांच्या गळ्यातील दागिने जबरदस्तीने चोरून नेत. तर त्यांचे मित्र प्रमोद व अनिस यांच्या मदतीने चोरलेले दागिने सराफ जमिर याला विक्री करत होते.
दरम्यान 42 वर्षीय महिला मॉर्निंग वॉकला आल्यानंतर केशवनगर भागात दुचाकीवरुन आलेल्या सोन साखळी चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 80 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरले होते. या गुन्ह्याचा तपास मुंढवा पोलीस करत होते. यावेळी कर्मचारी दिनेश राणे यांना बतमीदारामार्फत माहिती मिळाली की, हा गुन्हा दीपक माळी याने केला आहे. त्यानुसार त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्हा साथीदार मुकेश याच्या मदतीने केल्याचे सांगितले. त्यालाही पोलिसांनी पकडले. दोघांनी शहरात 5 ठिकाणी महिलांच्या गळ्यातील सोन साखळ्या चोरल्या असल्याचे तपासात उघडकीस आले. ते चोरलेले सोने सराफाला मित्राच्या मदतीने विकत असत असल्याचे समोर आल्यानंतर त्या मित्रांसह सराफाला देखील अटक करण्यात आली.

ही कारवाई सुहास बावचे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक संपतराव भोसले, सहाय्यक निरिक्षक विजय चंदन, कर्मचारी निलेश पालवे, महेश पाठक, दीपक कांबळे यांच्या पथकाने केली.