Pune : पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चौघांना अटक, लोणीकाळभोर परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या सहा जणांच्या टोळीतील चौघांना पोलिसांनी पकडले. तर दोघे पसार झाले आहेत. त्यांच्याकडून एक पिस्तुल आणि घातक शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. लोणी काळभोर परिसरात ही घटना घडली आहे.

गणेश राजेंद्र शिवडकर (वय 21), सुनील प्रकाश गायकवाड (वय 23), तिलकसिंग गब्बरसिंग टाक (वय 19), निशांत उर्फ ब्लॅक अनिल ननावरे (वय 24) या चौघांना पकडले आहे. तर साथीदार किशोर प्रकाश गायकवाड व आकाश गणपत माने हे दोघे पसार झाले आहेत. पोलीस हवालदार उदय काळभोर यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौघेजण रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. सोलापूर महामार्गावरील उरुलिकांचन येथून डाळिंब गावाकडे जात असताना असलेल्या भारत पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने चार चाकीत दबा धरून बसले होते. माहिती मिळताच पोलिसांनी येथे धाड टाकत त्यांना पकडले. पण, दोघे पसार झाले. या पकडलेल्या आरोपींची झडती घेतली. त्यावेळी त्यांच्याकडे एक गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतुसे, लोखंडी कोयता, कटावणी, कटर, चाकू, कात्री, मिरचीपूड असे साहित्य मिळाले. अधिक तपास पोलिस करत आहेत.