पुण्यात कोरोनाबाबत अफवा पसरविणारा अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – करोनाबाबत खोटी माहिती देऊन अफवा पसरविणाऱ्यास पोलिसांनी अटक केली. खडकी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. त्याने मित्राच्या मोबाईलवरून नियंत्रण कक्षाला फोनकरून प्रार्थना स्थळ येथे नागरिक जमल्याची खोटी माहिती दिली होती.

प्रकाश पांडुरंग दळवी (रा. मुळा रोड, खडकी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस नियंत्रण कक्षाला 1 एप्रिल रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास एकाने फोन केला. मुळा रस्त्यावरील एका प्रार्थनास्थळ येथे नागरिक जमल्याचे सांगितले. त्यानंतर नियंत्रण कक्षाकडून तत्काळ खडकी पोलिसांना घटनास्थळी पाठविण्यात आले. तसेच, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ त्या ठिकाणी धाव घेतली. तसेच, त्या प्रार्थना स्थळाच्या व्यवस्थापकांना बोलवून घेतले. ते प्रार्थनास्थळ उघडून पाहिल्यानंतर त्या ठिकाणी कोणी नव्हते. त्यामुळे कोणीतरी खोटी माहिती सांगितल्याचे दिसून आले.

त्यावेळी पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करणाऱ्याची माहिती काढण्यास सुरूवात केली. त्यावेळी हा फोन दळवी याने केल्याचे आढळून आले. पोलिसांना सुरवातीला दुसऱ्या व्यक्तीचा क्रमांक आढळून आला होता. त्यावेळी त्याने दळवीने फोन घेऊन हा फोन केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार दळवीला अटक केली.