हाय सिक्युरिटी नंबरप्लेट चोरणारा सुपरवायझर अटकेत

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – दत्तवाडी परिसरातील कंपनीतून वाहनांच्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट चोरणार्‍या कंपनीच्या सुपरवायझरला दत्तवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याने तब्बल 600 हाय सिक्युरिटी नंबर प्लेट चोरल्या होत्या.

अनिल अशोक शिंदे (वय 30, रा. खोपडेनगर, कात्रज) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून 50 हजार रुपये किंमतीच्या 324 नंबरप्लेट जप्त करण्यात आल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र शासनाच्या निर्णयानुसार देशभरातील सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी नंबरप्लेट बसविण्यात येत आहेत. त्यानुसार दत्तवाडीत एका कंपनीकडून हाय सिक्युरिटी नंबरप्लेट तयार करण्यात येत आहेत. याठिकाणी कंपनीत आरोपी सुपरवायझरचे काम करत होता. त्याने कंपनीतूनच 90 हजारांच्या 600 हाय सिक्युरिटी नंबरप्लेट चोरुन नेल्या. हा प्रकार समोर आल्यानंतर कंपनीच्या वतीने दत्तवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. यानंतर दत्तवाडी पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला होता.

अनिल हा वाघजाई माता परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, त्याला पकडण्यात आले आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे, पोलीस निरीक्षण राजेंद्र सहाणे यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कुलदीप संकपाळ, रवींद्र पुैलपगारे, राजू जाधव, सुधीर घोटकुले, महेश गाढवे, शिवाजी क्षीरसागर, शरद राउत, नवनाथ भोसले, अक्षयकुमार वाबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.