pune : हडपसर परिसरातील ज्वेलर्सच्या फसवणूकीचा प्रयत्न, इन्कम टॅक्सच्या नावाखाली गंडा घालणार्‍याला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – हडपसर परिसरातील ज्वेलर्स व्यवसायिकाला इन्कम टॅक्समधून बोलत असल्याचे सांगत त्यांचे औरंगाबाद येथील सराफी दुकान सील करण्याची ऑर्डर आली असून, कारवाई न करण्यासाठी 37 हजार रुपयांची मागणी करून फसवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे.
पोलिसांनी मुंबईतील एकाला अटक केली आहे.

राहुल किरण सराटे (रा. चेंबूर ईस्ट, मुंबई) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात शशांक पुणेकर यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सराफी व्यवसायिक आहेत. त्यांचे औरंगाबाद शहरात एक सराफी दुकान आहे. दरम्यान यातील आरोपीने त्यांना फोन केला. तसेच, मी इन्कम टॅक्समधून अधिकारी राजेंद्र कदम बोलत असल्याची बतावणी करून त्यांना तुमचे औरंगाबाद येथील दुकान सील करण्याची ऑर्डर आली आहे. ते सील करायचे नसेल तर गुगलद्वारे 37 हकार 500 रुपये भरण्यास सांगितले. पण, फिर्यादी यांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी लागलीच गुन्हा दाखल करत त्याला पकडले. अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत.