येरवडा कारागृहातून जामिनावर बाहेर आलेल्याच्या खूनप्रकरणी एकाला अटक

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन  –  कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर येरवडा कारागृहातून जामिनावर सोडल्यानंतर फुटपाथवर झोपलेल्या कच्च्या कैद्याच्या खूनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. किरकोळ कारणावरून त्याचा खून झाल्याचे समोर आले आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने याआरोपीचा शोध लावण्यात आला आहे.

राजू उर्फ बॉन्ड बबन कांबळे (वय 25, रा. अकलूज, सोलापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. मुन्ना ईश्वर चव्हाण (वय 23, रा. शास्त्रीनगर, बीड) असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दोन दिवसांपूर्वी पुणे स्टेशन येथील अलंकार चौकाजवळील फुटपाथवर एकाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. तपासणी केल्यानंतर तो रेल्वे पोलिसांच्या चोरीच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात होता. पण त्याला कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर जामीनावर सोडले होते. जामिनावर बाहेर आल्यापासून तो पुणे स्टेशन येथील फुटपाथवर झोपत होता. त्यानंतर त्याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याचे समोर आले होते. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला होता.

बंडगार्डन पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी एक संशयित व्यक्ती घटनेच्या दिवशी पळून जाताना दिसत होता. त्याची माहिती काढल्यानंतर तो बॉन्ड असल्याचे आढळून आले. तसेच, तो कॅम्प परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक श्रीकांत शिंदे, दिगंबर शिंदे व सहायक निरीक्षक जमदाडे यांच्या पथकाने त्याला पकडले. त्याच्याकडे चौकशी केली. पण, उडवाउडलीची उत्तरे देत होता. त्याला पोलिसी खाक्या दाखलिल्यानंतर दोन दिवसांपूर्वी मयतासोबत वाद झाला होता. त्याच्या रागातून दगडाने ठेचून खून केल्याची कबुली दिली. याप्रकरणी त्याला अटक केली आहे.