नोबेल हॉस्पीटल बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देणारा उच्चशिक्षीत पोलिसांच्या जाळ्यात

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – हडपसर परिसरातील नोबेल हॉस्पीटलला इमेल पाठवून 10 लाखांची खंडणी मागणी करत पैसे न दिल्यास हॉस्पीटल बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणार्‍या तरुणाला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. तरूणाने ताण-तणावातून हे कृत्य केले असून, तो उच्च शिक्षीत असल्याचे समोर आले आहे.

प्रविण हिराचंद कुंभार (वय 31, रा. पापडे वस्ती, भेकराईनगर, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गेल्या महिन्यात (1 जानेवारी) नोबेल हॉस्पीटलच्या इमेलवर एका अज्ञाताने इमेल केला होता. तसेच, त्यात 10 लाख रुपयांची खंडणीची मागणी केली होती. पैसे न दिल्यास हॉस्पीटल बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती. त्यानंतर पुन्हा आठवड्याने अशाच प्रकारचा आणखी एक इमेल आला होता. त्यामुळे हॉस्पीटलसह शहरात एकच खळबळ उडाली होती.

या गुन्ह्याचा समांतर तपास सायबर पोलीस करत होते. त्यावेळी पोलिसांनी इमेलची तपासणी करण्यास सुरूवात केली. इंटरनेटचा वापर कुठून झाला याचीदेखील माहिती काढण्यात आली. त्यावेळी तो गोवा आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या परिसरातून झाल्याचे निष्पन्न झाले. परंतु, इंटरनेट हे विना पासवर्ड असणारे वायफाय आणि हॉटस्पॉटवरून झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर इंटरनेट कंपनीकडून याची माहिती घेतली गेली. त्यानंतर हा गुन्हा प्रविण याने केला असल्याचे समजले. त्यानुसार, सायबर व आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम, सहाय्यक आयुक्त शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक जयराम पायगुडे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

नोकरी नसल्याने नैराश्य…
प्रवीण हा उच्चशिक्षीत असून, त्याचे फिजीक्समधून त्याने एमएससीचे शिक्षण घेतले आहे. तसेच, त्याचा विवाह देखील झाला आहे. परंतु, नोकरी नसल्याने तो नैराश्यात आणि ताण-तणावात राहायचा. सध्या तो काहीच करत नव्हता. यामुळे त्याने यातूनच हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.