महसूल अधिकाऱ्यांच्या ताब्यातून वाळूचा ट्रक पळवणारा गुन्हे शाखेकडून अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – महसूल अधिकाऱ्यांनी अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई करून जप्त केले होते. अधिकाऱ्यांनी जप्त केलेला ट्रक चोरून नेणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी गुन्हा घडल्यापासून 10 महिने फरार होता. पोलिस त्याच्या मागावर होते मात्र तो पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर गुन्हे शाखा युनिट ४ च्या पोलिसांनी त्याला शेवाळवाडी येथे सापळा रचून अटक करण्यात आली. शेखर विठ्ठल खैरे (वय-25 रा. हिंगणे बेरडी, ता. दौड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

महसूल अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या पथकाने हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेवाळवाडी येथे २ ऑक्टोबर २०१८ मध्ये वाळूच्या ट्रकवर कारवाई करून हायवा टिपर (एमएच ४२ टी ८१०९) वाळूसह जप्त केला होता. ट्रक चालकाने महसूल अधिकारी यांची नजर चुकवून ट्रक चोरून नेला होता. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली होती. गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड व पोलीस नाईक सुरेंद्र साबळे यांना दहा महिन्यांपूर्वी कारवाई केलेला हायवा टिपर दौंड येथून वाळू घेऊन पुणे शहरामध्ये वाळू विक्रीसाठी येत असल्याची माहिती मिळाली. गुन्हे शाखा युनिट ४ च्या पथकाने सोलापूर-पुणे महामार्गावर गस्त घालून हायवा टीपर शेवळवाडी येथे पकडून आरोपीला अटक केली.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त गुन्हे बच्चनसिंग, पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड, पोलीस कर्मचारी सुरेंद्र साबळे, शितल शिंदे, रमेश चौधर, निलेश शिवतरे यांच्या पथकाने केली.

आरोग्यविषयक वृत्त –