बेकायदेशीर पिस्तूल बाळगणार्‍या सराईतास पकडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बेकायदेशीर पिस्तूल बाळगणार्‍या एका सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्याकडून गावठी पिस्टल व 1 जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे.
विठ्ठल नवनाथ पिकळे (वय 21. रा. कोरेगाव खु॥ ता. खेड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी नारायणगाव पोलीस ठाण्यात आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विठ्ठल पिकळे हा पोलिसांच्या अभिलेखावरील गुन्हेगार असून, त्याच्यावर चाकण पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न, चोरी व शरीराविरूद्धचे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील गुन्हेगारांना तसेच पाहिजे आरोपी व सराईत गुन्हेगारांची माहिती काढून त्यांना जेरबंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यादरम्यान, एलसीबीचे पथक सराईतांची माहिती काढत होते. यावेळी पोलिसांना विठ्ठल हा नारायणगाव येथील बस स्थानकात उभा असून, त्याच्याजवळ गावठी पिस्तूल असल्याची माहिती एलसीबीला मिळाली होती.

त्यानुसार, वरिष्ठ निरीक्षक पद्माकर घनवट, स.फौ. जगताप, कर्मचारी शंकर जम, सुनिल जावळे, शरद बांबळे, दिपक साबळे, एम. आय. मोमीण,  अक्षय नवले यांच्या पथकाने याठिकाणी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस मिळाले. पोलिसांनी त्याला पुढील तपासासाठी नारायणगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. दरम्यान, त्याने हे पिस्तूल कोठून आणले आणि तो त्याचा वापर कशासाठी करणार होता याचा तपास करण्यात येत आहे.