बदला घेण्यासाठी हत्यारे बाळगणारे पुणे पोलिसांकडून जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून भांडणाचा वचपा काढण्यासाठी धारदार शस्त्र आणि बनावट पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून धारदार कोयते आणि बनावट पिस्टल जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई पुणे सातारा महामार्गावर करण्यात आली.

आदित्य विनोद नाईक (वय-१९ रा. हनुमाननगर, जांभुळवाडी रोड, आंबेगाव खु. पुणे), सागर हनुमंत अहिवळे (वय-२० रा. जांभुळवाडी रोड, आंबेगाव खु. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आदित्य नाईक याच्याकडून कोयता आणि कंबरेला खोचलेली बनावट पिस्टल जप्त करण्यात आली आहे. तर सागर याच्याकडून धारदार लोखंडी कोयता जप्त करण्यात आला आहे.

भारती विद्यापीठ पोलीस पुणे-सातारा महामार्गावरील लॉजची तपासणी करत होते. त्यावेळी एका दुचाकीवर दोन तरून भरधाव वेगात जाताना पोलीस नाईक सर्फराज देशमुख यांना दिसले. त्यांचा संशय आल्याने त्यांनी दोघांचा पाठलाग करून पकडले. त्या दोघांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे कंबरेला खोचलेले कोयते आणि बनावट पिस्टल आढळून आली. दोघांकडे केलेल्या सखोल चौकशीत अमित शिर्के याच्याबरोबर पूर्वी भांडण झाले होते. याचा राग मनात धरून दहीहंडी किंवा गणेश उत्सवादरम्यान संधी मिळताच त्याला मारण्याच्या उद्देशाने हत्यार बाळगल्याचे सांगितले.

ही कारवाई पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त श्रीकांत तरवडे, परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, स्वारगेट विभागाचे सहायक पोलीस आयुक्त मालोजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे विष्णू ताम्हाणे, तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक सुबराव लाड तसेच तपास पथकाचे कर्मचारी व सहायक पोलीस आयुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी संयुक्तरित्या केली.

आरोग्यविषयक वृत्त