Pune News : सिग्नलवर वाहनचालकांना धमकावून पैसे उकळणाऱ्या 13 तृतीयपंथीयांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहराच्या विविध भागातील गर्दीच्या सिग्नला थांबलेल्या वाहनचालकांकडून धमकावून जबरदस्तीने पैसे घेणाऱ्या 13 तृतीयपंथीयांना अटक करण्यात आली आहे. सिग्नलवर जबरदस्तीने पैसे उकळणाऱ्या तृतीयपंथीयांवर पुणे पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. नागरिकांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी ही कारवाई सुरु केली आहे.

सातारा रस्ता, मुंबई-पुणे रस्ता, पुणे सोलापूर रस्ता तसेच शहरातील महत्त्वाच्या आणि गर्दीच्या चौकात सिग्नला तृतीयपंथी वाहनचालकांकडू जबरदस्तीने पैसे उकळत असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. वाहन चालकाने पैसे दिले नाहीतर वाहनासमोर उभे राहयचे. त्यामुळे वाहतूक कोंडी होत होती. काही सिग्नलला तृतियपंथी वाहनचालकाला धमकावून पैसे उकळत असल्याचे समोर आले. या संदर्भातील माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बच्चन सिंग यांना समजली तसेच नागरिकांनी पोलिसांत तक्रारी केल्या होत्या.

पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेतली. समाजिक सुरक्षा विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे यांनी संबंधीत तृतीयपंथीयांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पथकाने येरवड्यातील सादलबाब चौकात 3, हडपसर येथील लोणी टोलनाका येथे 3, बंडगार्डन परिसरातील घड्याळ चौक 2, सारसबागेजवळील चौकात 3, पौड रस्त्यावरील करिश्मा सोसायटी चौकात 2 जणांवर कारवाई केली. वाहनचालकांची वाहने अडवून त्यांच्याकडून पैसे उकळल्याप्रकरणी 13 तृतियपंथियांवर महाराष्ट्र भिक्षा प्रतिबंध अधिनियमानुसार कारवाई करण्यात आली.