पुण्यात एटीएम फोडणाऱ्या तिघांना रंगेहाथ पकडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मुंढव्यातील पिंगळे वस्ती येथील गंगा आॅर्चिड सोसायटीचे कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या एचडीएफसी बँकेचे एटीएममध्ये फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना मध्यरात्री गस्त घालणाऱ्या पोलिसांनी रंगेहाथ पकडले.

प्रकाशकुमार रंगाराम मेघवंची (वय २२), किसन मांगीलाल मेघवाल (वय १९) आणि भरत प्रतापसिंग ईरागर (वय १९, तिघे रा़ बालाजी सुपर शॉपीमागे, तुपे कॉर्नर, हडपसर, मुळचे राजस्थान) अशी या तिघांची नावे आहेत.

दिवाळीतील लक्ष्मी पूजनाचा दिवस असल्याने त्या दिवशी विशेषत: नागरिक रोख रक्कम व दागिन्यांचे पूजन करीत असतात. त्यामुळे शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना सतर्कतेने गस्त घालण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्याप्रमाचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप व त्याचे अधिकारी, कर्मचारी गस्त घालत असताना मध्यरात्री २ वाजता दोन जागरुक नागरिकांनी गंगा आॅर्चिड सोसायटीतील एचडीएफसी बँकेचे एटीएममध्ये काही जण संशयास्पदरित्या चोरी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पोलीस नियंत्रण कक्षाला कळविले. तात्काळ मुंढवा मार्शल पोलीस शिपाई बालाजी व्यंकट काटे, पोलीस नाईक आढारी हे तेथे गेले. त्यांनी तेथे उभे असणारे व आत एटीएम मशीनची तोडफोड करुन रोख रक्कम चोरण्याचा प्रयत्न करणा ऱ्याला अशा तिघांना ताब्यात घेतले. रात्र गस्त अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक पी. एच. रेजीतवाड यांनी तिघांना अटक केली.  मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाथरूडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमीत वाळके गुन्हयाचा अधिक तपास करीत आहेत.

जागरुक नागरिकांमुळे एटीएममधून काही लाख रुपयांच्या चोरीचा प्रयत्न फसला आहे.