पॅरोलवर बाहेर पडल्यानंतर 15 वर्षापासून फरार असणार्‍या खूनाच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बहिणीच्या खूनप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतर पॅरोलवर बाहेर आल्यानंतर गेल्या 15 वर्षांपासून पसार झालेल्यास गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली. प्रेमप्रकरणावरून सख्ख्या बहिणीवर कोयत्याने सपासप वार केले होते.

दादा महादेव नाईकनवरे (वय 45, रा. पिराची कुरोळी, ता. पंढरपुर, जि. सोलापूर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे. पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यातंर्गत 2002 मध्ये दादा नाईकनवरे याने प्रेमप्रकरणातू सख्ख्या बहिणीवर कोयत्याने वार करुन खून केला होता. न्यायालयाने त्याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. 2003 पासून दादा येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत होता. यानंतर ऑक्टोबर 2005 मध्ये दादा तीन महिन्यांच्या पॅरोल रजेवर बाहेर आला. त्यानंतर तो पुन्हा येरवडा कारागृहात हजर झाला नाही. तेव्हापासून तो फरार झाला होता. दरम्यान, कारागृहातून पॅरोल व संचेत रजेवर बाहेर आलेले कैदी पुन्हा परत येत नसल्याच्या घटना घडत आहेत. गेल्या काही वर्षांत शेकडो कैदी पसार असून, त्यांचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान, रांजणगाव (ता. शिरुर ) परिसरात दादा खोटे नाव वापरून संतोष साठे नावाने वावरत असल्याची माहिती पोलीस नाईक विल्सन डिसोझा यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून अटक केली. अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, पोलीस उपनिरीक्षक किरण अडागळे, राहूल घाडगे, मच्छिंद्र वाळके, गजानन गाणबोटे, विल्सन डिसोझा, संदीप राठोड, सुजीत पवार, कल्पेश बनसोडे यांच्या पथकाने केली.