लिफ्टच्या बहाण्याने ज्येष्ठ महिलांना एअरगनच्या धाकाने लुटणारी टोळी जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ज्येष्ठ महिलांना लिफ्ट देण्याचा बहाण्याने त्यांना वाहनात बसवून एअरगनचा धाक दाखवत लुटमार करणार्‍या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून विविध ठिकाणचे 6 गुन्हे उघडकीस आले आहेत.

विकास तुकाराम जाधव आणि संतोष उर्फ भावड्या अंकुश वडेकर (रा. कामशेत) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. तर, त्यांचे दोन सहकारी पसार झाले आहेत.

पंधरा दिवसांपुर्वी वडगाव मावळ येथील चिंदाबाई पवार यांना सायंकाळी दोघांनी कारमध्ये लिफ्ट देण्याच्या बहाण्याने त्यांना गाडीत बसविले. त्यानंतर निर्जनस्थळी गेल्यानंतर त्यांना एअरगनचा धाक दाखवून त्यांच्याकडील दोन तोळे सोन्याची दागिने जबरदस्तीने काढून घेतले. तसेच, त्यांना सोडून आरोपी पसार झाले. याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा करत होती. वरिष्ठ निरीक्षक पद्माकर घनवट यांनी मार्गदशनकरून आरोपींचा माग काढण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार पथकाने आरोपींचा माग काढण्यास सुरूवात केली. त्यावेळी चौघेजन इरटिगा कारचा वापरकरून ज्येष्ठ महिलांना लिफ्ट तसेच प्रवाशी म्हणून बसवत त्यांना एअरगनच्या धाकाने लुटत आहेत. तसेच, ते कान्हेफाटा चौकात थांबले आहेत, अशी माहिती मिळाली. त्यानुसार, एलसीबीचे वरिष्ठ निरीक्षक घनवट व त्यांच्या पथकाने याठिकाणी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. मात्र, दोघेजन पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यांच्याकडे चौकशी केली सता त्यांनी गुन्हा केल्याचे सांगितले. त्यांच्याकडून कामशेत, वडगावमावळ, चाकण, लोणावळा येथील गुन्हे उघडकीस आले आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/