फिल्मी स्टाईलने तरुणावर कोयत्याने सपासप वार करणारा तडीपार अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुर्ववैमन्यासातून तरुणाचा फल्मी स्टाईल पाठलागकरून कोयत्याने सपासप वार केल्यानंतर पसार झालेल्या तडीपार गुंडासह त्याच्या साधीदारांना पोलिसांनी अटक केली आहे.

सुरेश उर्फ आप्पा प्रकाश मुस्तारी (वय 24, रा. कोंढवा खुर्द), सुनिल उर्फ राठ्या गोपाळ राठोड (वय 23, रा. लमानवस्ती, उत्तमनगर) व प्रदीप उर्फ पद्या संजय नलावडे (वय 22) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत अमित निंबाळकर याने भारती विद्यापीठ पोलीस तक्रार दिली होती.

सागर माने आणि फिर्यादी अमित यांचा दोन महिन्यांपुर्वी वाद झाला होता. गाड्या घासल्यावरून हा वाद झाला होता. त्याचा राग सागर माने याच्या मनात होता. त्यावरूनच त्याने साथीदार सराईत गुन्हेगार सुनील राठोड तसेच इतर दोघांना पाळत ठेवून त्याला मारण्याचे सांगितले होते.

त्यानुसार, आरोपींनी सोमवारी सकाळी फिर्यादी अमित हा कात्रज येथील तलावाजळ आल्यानंतर गाठले. तसेच, त्याच्यासोबत वाद घालून मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यावेळी अमित हा तेथून पळून जाऊ लागला असता आरोपींनी फिल्मी स्टाईलने जवळपास एक किलोमिटर त्याचा पाठलागकरून त्याला राजस सोसायटी चौकात गाठले. तसेच, त्याच्यावर कोयत्याने तसेच लाकडी दांडूक्याने सपासप वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपी पसार झाले होते.

आरोपींचा माग भारती विद्यापीठ पोलीस करत होते. यावेळी उपनिरीक्षक भूषण कोते, पोलीस कर्मचारी कुंदन शिंदे, सर्फराज देशमुख, राहुल तांबे, सचिन पवार, गणेश चिंचकर, अभिजीत रत्नपारखी, महेश मंडलीक, अभिजीत जाधव यांच्या पथकाने या तिघांना कात्रज घाट परिसरात ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी आरोपी सागर याच्या सांगण्यावरून मारहाण केल्याचे कबूली दिली.

दरम्यान, सुनील राठोड हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याला शहरातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. तरीही त्याने शहरात येऊन तरुणावर जीवे घेणा हल्ला केल्याने पोलिसांच्या तडीपारी कारवाईचा फज्जा उडाला आहे.

फेसबुक पेज लाईक करा –