अवैधरित्या दारूची वाहतूक करणारा पुणे पोलिसांच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अवैधरित्या हातभट्टी दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली. ही कारवाई कोंढवा पोलिसांनी टिळेकर नगर येथे आज (शनिवार) पहाटे साडे चारच्या सुमारास केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून 30 हजार रुपये किंमतीची 525 लिटर हातभट्टीची दारू आणि 75 हजार रुपये किंमतीची ओमनी व्हॅन असा एकूण 1 लाख 5 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्रदिप सुधाकर जाधव (वय 28 रा. गोकुळनगर, कात्रज कोंढवा रोड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

कोंढवा पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे कर्मचारी हद्दीमध्ये रात्री गस्त घालत होते. त्यावेळी पहाटे साडेचारच्या सुमारास एक लाल रंगाची ओमनी व्हॅन येवलेवाडी कडून टिळेकर नगरकडे जाताना आढळून आली. गाडीचा संशय आल्याने तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी गाडीचा पाठलाग करून गाडी टिळेकर नगर येथे अडवून गाडीची झडती घेतली असता गाडीमध्ये हातभट्टी दारूचे 15 कँड आढळून आले. पोलिसांनी आरोपीला अटक करून मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, परिमंडळ 5 चे पोलीस उपायुक्त सुहास बावचे, वानवडी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुनील कलगुटकर, कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, पोलीस निरीक्षक गुन्हे महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिपक बर्गे, चेतन मोरे, पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे, पोलीस हवालदार राणे, पोलीस नाईक योगेश कुंभार, पृथ्वीराज पांडुळे, सरगर, मांढरे यांच्या पथकाने केली.

फेसबुक पेज लाईक करा –