जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना पुणे पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन-हडपसर परिसरात घरफोडी, जबरी चोरी, वाहन चोरी, दरोडा या सारख्या गंभीर गुन्ह्यातील दोन आरोपींना हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. तर त्यांचे दोन साथिदार फरार झाले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून २० गुन्हे उघडकीस आले असून १९ लाख ५० हजार रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. ही कारवाई शनिवारी (दि.८) रात्री अकराच्या सुमारास सिरम कंपनीच्या पाठीमागील बाजुस असलेल्या कॅनॉल रोडवर सापळा रचून केली.

अर्जुनसिंग रजपुतसिंग दुधाणी (वय-४५ रा. भापकर वस्ती, मांजरी), गोगलसिंग बादलसिंग कल्याणी (वय ४६ रा. कोठारी व्हील शेजारी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर तिलकसिंग गब्बरसिंग टाक (वय-२४ रा. रामटेकडी), विकीसिंग जालिंदर कल्याणी (वय-२७ रा. रामटेकडी) हे फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

हडपसर पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे, पोलीस नाईक प्रताप गायकवाड, विनोद शिवले, नितीन मुंढे, पोलीस शिपाई अकबर शेख, शशिकांत नाळे हे हद्दीमध्ये गस्त घालत होते. पोलीस उप निरीक्षक मंगेश भांगे व नितीन मुंढे यांना चारजण हुदाई अॅक्सेंट गाडीतून माळवाडी परिसरात फिरत आहेत. ते माळवाडी परिसरातील एटीएमवर दरोडा टाकण्याच्या तयारी असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी आरोपींची गाडी अडवली असता आरोपी गाडी सोडून पळून जाऊ लागले असता त्यांचा पाठलाग करुन दोघांना ताब्यात घेण्यात आले. तर अंधाराचा फायदा घेऊन दोनजण फरार झाले. गाडीची झडती घेतली असता गाडीमध्ये ४ कटावण्या, ४ बोअर कटर, ३ स्क्रु ड्रायव्हर, २ पक्कड, १ मिरची पुड, १ सुती दोरी, १ तलवार असा मुद्देमाल मिळाला.

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकीकडे सखोल चौकशी केली असता आरोपींनी फरार साथिदारांच्या मदतीने हडपसर परिसरात घरफोडी, दरोडा, जबरी चोरी, वाहन चोरी केल्याची कबुली दिली. तसेच वापरलेली हुंदाई कार दहा दिवसांपूर्वी सिंहगड रोड पसरिसरातून चाकुचा धाक दाखवून चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे.

आरोपींनी हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दित १४, सिंहगड रोड, बिबवेवाडी, अलंकार पोलीस ठाण्यातील १ तर तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २ असे एकूण २० गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींकडून १ कार १ दुचाकी, २४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, १ एलईटीव्ही असा एकूण १९ लाख ५० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींनी पुणे परिसरात ३० ते ३५ गुन्हे दाखल असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पुर्व विभाग सुनिल फुलारी, परिमंडळ ५ पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, हडपसर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुनिल देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल तांबे, पोलीस निरीक्षक कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण, तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक मंगेश भांगे, पोलीस नाईक प्रताप गायकवाड, विनोद शिवले, राजेश नवले, पोलीस शिपाई नितीन मुंढे, अकबर शेख, शशिकांत नाळे यांच्या पथकाने केली.