घरफोडी करणाऱ्या दोन सराईतांना पुणे पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे शहरातील घरफोडी, चोरी, जबरी चोरीच्या गुन्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांनी क्रिप्स (क्रिमिनल इटेलिजन्स सर्व्हेलन्स प्रोग्रॅम) मोहीम राबण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत गुन्हे शाखा युनिट – 4 च्या पथकाने दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली. तपासामध्ये दोघांनी मानपाडा, ठाणे, दिवा, नवी मुंबई, खोपली, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये घरफोडीचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी त्यांच्याकडून 9 गुन्ह्यातील 2 लाख 44 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

हर्षद गुलाब पवार आणि विकास सुनिल घोडके असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी हे नवी मुंबई येथे वास्तव्यास होते. दरम्यान, ते घरफोडीचे गुन्हे करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्यांचा शोध घेतला असता आरोपी खराडी बायपास चौक, चंदननगर येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती युनिट 4 च्या पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली. आरोपीकडून खडकी येथील गुन्ह्यातील 1 लाख 5 हजार रुपये किंमतीचे दागिने, 674 ग्रॅम वजानाचे चांदीचे दागिने, दोन दुचाकी असा एकूण 2 लाख 44 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

आरोपींना यापूर्वी पुणे पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी त्यांच्याकडून 55 गुन्हे उघडकीस आले होते. आरोपींनी जामीनावर सुटल्यानंतर शहराबाहेर जाऊन घरफोडीचे गुन्हे केले. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना शनिवार (दि.16) पर्य़ंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त गुन्हे बच्चन सिंग, संभाजी कदम, आर्थिक गुन्हे सहायक पोलीस आयुक्त विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड, पोलीस उपनिरीक्षक विवेक सिसाळष पोलीस कर्मचारारी अब्दुलकरीम सय्यद, भालचंद्र बोरकर, गणेश साळुंके, हनुमंत बोराटे, शितल शिंदे, सुरेंद्र साबळे, सचिन ढवळे, राकेश खुणवे, सुहास कदम यांच्या पथकाने केली.

Visit : Policenama.com