पुणे : माजी खासदार संजय काकडे यांना पुणे पोलिसांकडून दणका, ‘त्या’ प्रकरणात केली अटक, जाणून घ्या प्रकरण

पुणे : पोलीसनामा ऑलनाइन – माजी खासदार संजय काकडे यांना आज (बुधवार) पुणे पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना विचारले असता त्यांनी होय, संजय काकडे यांना अटक केली असल्याचं सांगितलं. कुख्यात गुन्हेगार गजानन मारणे हा तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर त्याच्या शेकडो समर्थकांनी मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वर रॅली काढली होती. त्यामध्ये शेकडो वाहनांचा समावेश देखील होता. या प्रकरणातील दाखल गुन्ह्यात कारवाई करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

यापुर्वी कुख्यात गुंड गजानन मारणे याला सातारा पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आणि त्याची रवानगी कारागृहात केली. सध्या त्याला पुण्याबाहेरील तुरूंगात हलवले आहे. दरम्यान, माजी खासदार संजय काकडे यांना पुणे पोलिसांनी अटक केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती लवकरच देण्यात येईल अशी माहिती पुण्याचे आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले आहे.

गुंड मारणेची त्याच्या समर्थकांनी तळोजा तुरूंगातून सुटल्यावर मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून जंगी मिरवणूक काढली होती. त्या मिरवणूकीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. संपुर्ण देशात ते फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली. याप्रकरणी पुण्याच्या गुन्हे शाखेनं तपास करून बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, प्रकरणाच्या चौकशीसाठी देखील अनेकांना बोलावले होते. अखेर आज (बुधवार) बंडगार्डन पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांत माजी खासदार काकडे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.