Coronavirus Impact : IT पार्कमध्ये पोलिसांची ‘कोरोना’ आजाराबाबत जनजागृती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूच्या आजाराबाबत परिमंडळ पाचमधील मगरपट्टा सिटीतील आयटी पार्कमध्ये पोलीसांनी आज जनजागृती केली. यावेळी त्यांना काळजी घेण्यासोबतच कमीतकमी कर्मचारी कामासाठी बोलवावेत असे सांगण्यात आले.

राज्यात कोरोना आजार वाढत आहे. त्यामुळे प्रशासन वेगवेगळी पाऊले टाकत आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे विशेष खबरदारी घेतली जात आहे. दोन दिवसापासून व्यापारी वर्गाने दुकाने बंद ठेवली आहेत. तर हॉटेल्स बारदेखील बंद ठेवले आहेत. शाळा महाविद्यालयांना सुट्या देण्यात आलेल्या आहेत.

यापार्श्वभूमीवर आयटी पार्क आणि इतर कंपन्यांना शक्य असल्यास त्यांना देखील वर्क फॉर्म होम करण्यास सांगितले आहे. शासनाने सरकरी नोकरांना 50 टक्के कपात करून एकाच वेळी न बोलवता एक दिवसाआड बोलविण्यास सांगितले आहे.

पुण्यात सर्वाधिक रुग्ण असल्याने जिल्हाधिकारी व पोलीस वेगवेगळ्या पातळ्यांवर निर्णय घेऊन नागरिकांना घराबाहेर न पडण्यास सांगत आहेत. पुण्यात खडकी, मगरपट्टा सिटी व इतर ठिकाणी आयटी पार्क आहे. तर पिंपरी-चिंचवडला हिंजवडी सर्वात मोठे आयटी पार्क आहे.

याच पार्श्वभूमीवर परिमंडळ पाचमध्ये मगरपट्टा सिटीत पोलिस उपायुक्त सुहास बावचे आणि हडपसर पोलिसांनी आज जनजागृती केली. तेथील कामगार व कंपन्यांना अजाराबाबत माहिती देऊन त्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले. तसेच कमीत कमी कर्मचारी बोलवून कसे काम करता येईल याची देखील माहिती दिली.