पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांच्या हस्ते १७ व्या महाराष्ट्र पोलीस कर्तव्य मेळाव्याचे उद्घाटन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील रामटेकडी येथील आरपीएफ मैदानावर १७ व्या महाराष्ट्र पोलीस कर्तव्य मेळाव्याचे उद्घाटन उत्साही वातावरणात पार पडले. पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांच्या हस्ते बुधवारी उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी प. महाराष्ट्र्र सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तर स्पर्धेतील संघांनी मान्यवरांना लयबध्द व शिस्तबध्द संचलन करून मानवंदना दिली. ही स्पर्धा राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने आयोजित केली जाते. वेगवेगळ्या ६ प्रकारच्या स्पर्धांचा समावेश

डॉ. के. व्यंकटेशम यावेळी बोलताना म्हणाले की, पोलीसांना कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हे तपास व गुन्हे नियंत्रण अशी महत्वाची कामे करावी लागतात. सर्वात महत्वाचे आव्हानात्मक काम म्हणजे क्लिष्ट गुन्ह्यांची उकल करणे. पुर्वी गुन्ह्यांची तसेच गुन्हेगारांची संख्या कमी होती. त्यावेळच्या गुन्ह्याची पध्दत व त्या गुन्हंयाच्या तपासाची पध्दत साचेबध्द होती. मात्र विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रगत होत गेल्यानंतर याचा थेट परिणाम गुन्हेगार व त्यांच्या गुन्हे करण्याच्या पध्दतीवर झाला आहे. त्यामुळे गुन्हेगारांची संख्या वाढत गेली. परिणामत: पोलीसांना देखील आपला तपास करताना तपास कौशल्याचा जास्तीत जास्त प्रभावीपणे वापर व्हावा व तपास करताना आधुनिक तपास पध्दतीमध्ये न्याय वैज्ञानिकशास्त्र, दुकश्राव्यमाध्यम, श्वानपथक, अंगुलीमुद्रा, संगणक इत्यादी तंत्रांचा वापर करावा लागला.

या सर्वांचा उद्देश, उत्कृष्ट पोलीस तपास, चांगल्या पध्दतीने पुरावे गोळा करून त्यांचे जतन करुन, आरोपींविरुद्ध न्यायालयात पोलीस केस भक्कमपणे उभी करणे व जास्तीत जास्त गुन्हेगारांना शिक्षा मिळविणे हाच आहे. वरील उद्देश लक्षात घेवुनच पोलीस कर्तव्य मेळाव्यात पोलीस खात्यात काम करणाऱ्या, सर्व तपासी अंमलदार व तपासास सहाय्य करणाऱ्या पोलीस खात्याचे इतर घटक भाग घेवुन आपआपले तपास कौशल्य पणास लावत असतात.

प्रास्तविक करताना अतुलचंद्र कुलकर्णी यांनी सांगितले की या कार्यक्रमाचा उद्देश व ध्येय सांगत पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे व्यावसायिक कोशल्य, नैपुण्य व कार्यक्षमता यांचा दर्जा वाढविण्यासाठी घेतली जाते. ९ परिक्षेत्र, १० आयुक्तालये, गुन्हे अन्वेषण विभाग, राज्य राखीव पोलीस बल, बिनतारी संदेश विभाग, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी, दहशतवाद विरोधी पथक, फोर्स वन मुंबई, राज्य गुप्तवार्ता विभाग असे २५ संघ सहभागी झाले आहेत. या स्पर्धेतुन यशस्वी झालेले अधिकारी व कर्मचारी यांची निवड अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्याकरीता करण्यात येते.

Visit : Policenama.com 

You might also like