Pune News : दामिनी पथकाकडून 1229 रोड रोमियोंविरोधात ‘अ‍ॅक्शन’, पोलिसांवर कौतुकांचा वर्षाव

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे पोलिसांच्या दामिनी पथकाने रस्त्यावरून जाणाऱ्या तरुणींचा पाठलाग करणं, त्यांची छेड काढणाऱ्या रोड रोमियोंना चांगलाच धडा शिकवलेला आहे़ आतापर्यंत एक हजार २२९ जणांविरोधात कारवाई करण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजाता शानमे यांनी दिली आहे. दरम्यान, दामिनी पथकाच्या कारवाईचं पुणेकरांकडून कौतुक केलं जात आहे.

सुजाता शानमे म्हणाल्या की, गतवर्षी दामिनी पथकाने शहरातील अनेक भागात जनजागृतीपर एक हजार ९२१ कार्यक्रम घेतले. तर चार हजार ४३ कंट्रोल रूम येथे फोन आले. यादरम्यान छेडछाडीच्या एक हजार २१९ घटना घडल्या आहेत. अशा रोड रोमियोंवर कारवाई करण्यात आली आहे. दररोज अनेक भागात गस्त सुरू असताना अनेक घटना समोर येतात आणि सोडवण्याचे काम केलं जात आहे. तरुणींना कोणत्याही समस्या असल्यास त्वरित पोलिसांना कळविण्याचे आवाहन त्यांनी केलं आहे़.

दोन हजार ७३ पैकी ८०७ अर्जांवर तोडगा

महिला सहाय्य कक्षाकडे देखील पती-पत्नी असंख्य समस्या घेऊन येतात़ समुपदेशनाच्या माध्यमातून वाद मिटवून, त्या दोघांना पूर्वीसारखे आयुष्य जगण्याच्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न वरिष्ठ अधिकारी ते आमची १४ जणांची टीम करत असते. तर याच महिला सहाय्य कक्षात गतवर्षी पती-पत्नी मधील वादाच्या घटनांबाबत दोन हजार ७३ अर्ज आले असून ८०७ अर्जांमध्ये तोडगा निघाला आहे. ते एकत्रित राहत असून ८०० अर्ज प्रगती पथावर आहे. त्यात देखील आमच्या टीमला यश मिळेल्याचे सुजाता शानमे यांनी सांगितले़

नागरिकांमध्ये पोलिसांप्रती विश्वास निर्माण

भरोसा सेलच्या माध्यमातून पती पत्नी वाद, ज्येष्ठ नागरिक, बाल पथक आणि दामिनी पथक याद्वारे अनेक कामं मागील दोन वर्षांपासून केलं जात आहे. या दरम्यान अनेक घटना समोर आल्या. त्यामध्ये कोणत्याही घटनांचे समुपदेशन करून मार्ग काढण्याचे काम भरोसा सेल करीत आहे. यातून नागरिकांमध्ये पोलिसांप्रती विश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळे कौटुंबिक किंवा आपल्या जीवनाशी निगडित समस्यांचे निराकरण करण्याचं काम केलं जात आहे.