पुणे पोलिसांनी 4.5 कोटींच्या अंमली पदार्थाची केली ‘होळी’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –   पुणे पोलिसांनी शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जप्त केलेले तब्बल 4 कोटी 46 लाखांच्या अंमली पदार्थाची मंगळवारी (दि. 23) होळी केली. भारत फोर्ज कंपनीच्या भट्टीत अंमली पदार्थ जाळून नष्ट करण्यात आले. यातसर्वाधिक 655 किलो गांजा होत्या.

156 गुन्ह्यात जप्त केलेले हे अंमली पदार्थ नष्ट करण्यासाठी शासनासह विविध विभागाच्या परवानगी पुणे पोलिसांनी घेतली होती. त्यानुसार मंगळवारी वरीष्ठ पोलीस अधिका-यांच्या उपस्थितीत भारत फोर्ज कंपनीच्या भट्टीत अंमली पदार्थाची होळी करण्यात आली. नष्ट केलेल्या अंमली पदार्थामध्ये 1 कोटी 31 लाख रुपयांचा 655 किलो गांजा, 2 लाख 78 हजाराचे 400 ग्रॅम चरस, 1 लाख 10 किंमतीचे 1 किलो 812 ग्रॅम कोकेन, 1 कोटी 75 लाखांचे ब्राऊन शुगर, 15 लाखांचे मॅथेक्युलोन नष्ट केले आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, यांच्या मार्गदर्शनाखाली गठीत केलेल्या समितीने अंमली पदार्थाचा नाश केला आहे.