पुण्यात पोलिसांकडून वारांगनांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – चीनमधून कोरोना जगभर पसरला आहे . भारतातही कोरोनाने धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. अशातच या कोरोनासारख्या न दिसणाऱ्या विषाणूशी लढण्यासाठी संपूर्ण देशच लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व उद्योग धंदे ठप्प आहेत. ज्यांचं पोट रोजच्या कमाईवर चालते अशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. अशातच वारांगनांना देखील दोन वेळचे अन्न मिळणे मुश्किल झाले आहे. पण पोलिसांनी मात्र या वारांगना भगिनींची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना मदतीचा हात पुढे केला आहे.

टोकन पद्धतीचा अवलंब करीत केली मदत

पुणे पोलीस आयुक्त्यालयाच्या परिमंडळ १च्या उपयुक्त स्वप्ना गोरे यांच्या पुढाकाराने तसेच साद प्रतिष्ठान च्या सहकार्याने आज बुधवार पेठेतील वारांगनांना अन्न धान्याचे तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या वेळी टोकन पद्धतीने अतिशय शिस्तीत या सर्व महिलांना पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हस्ते हे धान्य वाटप करण्यात आले.

या वेळी परिमंडळ १च्या उपयुक्त स्वप्ना गोरे ,सहायक पोलिस आयुक्त प्रदीप आफळे, फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगनाथ कळसकर, सहायक पोलिस निरीक्षक यशपाल सूर्यवंशी यांच्या सह अधिकारी व कर्मचारी तसेच साद प्रतिष्ठानचे अमित ढोले, आदित्य तापडिया उपस्थित होते.