मांजाची विक्री करणार्‍यांची माहिती द्या अन् 1000 रूपयांचं बक्षीस मिळवा, पोलिसांची घोषणा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मकरसंक्रातीनिमित्त राज्यसह देशभरात पतंगबाजी केली जाते. पण, पतंगबाजी करताना घातक अशा चिनी मांजाचा वापर करण्यात येत असल्याने या मांजामुळे नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. गेल्या वर्षी मांजामुळे गळा कापून दोन महिलांना जीव गमवावा लागला होता. या पार्श्वभूमीवर पुणे पोलीसांनी मांजा विक्री करणार्‍यांची माहिती देण्यार्‍यास 1 हजार रुपयांचे बक्षिस जाहिर केले आहे. दरम्यान नुकत्याच दोन तरुणांचा या मांजामुळे गळा कापला गेल्याच्या घटना घडल्या आहेत.

संक्रातीच्यानिमित्त शहरात हौशी पतंगबाजी करतात. त्यातही आता पतंगबाजी करताना चिनी मांज्याचा वापर केला जात आहे. या मांज्यामुळे पादचारी, दुचाकीस्वार तसेच पक्ष्यांना इजा होत आहेत. गेल्या वर्षी भोसरी व शिवाजी पुलावर दोन दुचाकीस्वार महिलांना जीव गमावा लागला.

यानंतर पोलिसांनी चिनी मांजा विक्रेत्यांवर कारवाईची मोहिम उघडली. यंदाही पोलिसांनी चिनी मांज्याची विक्री करणार्‍यांवर कारवाईची विशेष मोहिम हाती घेतली. नुकतेच या मांजामुळे दोन तरुण जखमी झाले आहेत. त्यानंतर गुन्हे शाखेने विक्री करणार्‍यांवर कारवाईसाठी पथके तयार केली आहेत. तर, स्थानिक पोलीसांना तपासणीकरून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

गुन्हे शाखेच्या पथकांनी सोमवारी शहराच्या वेगवेगळ्या भागात व मध्यवस्थीत पतंग आणि मांज्या विक्रेत्यांवर छापे टाकले. पोलिसांनी छापे टाकले पण शहरातील एकाही पतंग विक्रेत्याकडे मांजा आढळून आला नसल्याचे सांगण्यात आले. शहरातील 97 पतंग विक्रेत्यांची तपासणी केली. परंतु, पतंग उडविणार्‍यांकडे चिनी मांजा मिळून येत आहे.

त्यामुळे चिनी मांज्याची माहिती देणार्‍यास 1 हजारांचे रोख बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. मांज्याची माहिती देणार्‍याचे नाव गुप्त ठेवले जाणार आहे. नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्ष (दूरध्वनी-100 किंवा 8975283100 किंवा 8975953100) या क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

स्थानिक पोलीस तोडपाणी करू लागले…
शहरात चिनी मांजामुळे पुणेकर जखमी होत आहेत. तर, पक्षांना इजा होत आहे. पण, स्थानिक पोलीस छापे मारी करून छोट्या विक्रेत्यांना पकडत आहेत. त्यांच्याकडे मांजा सापडल्यानंतर कारवाईच्या ऐवजी तोडपाणीकरून सोडून देण्यात येत आहे. काही दिवसांपुर्वीच एका पोलिस ठाण्यातील कर्मचार्‍यांने पकडून आणलेल्या एकाला अव्वाच्या सव्वा रुपयांची मागणी केली. पण, नंतर हे प्रकरण काही हजारांत मिटविण्यात आले.