Pune News : लॉकडाऊनमुळं तुटलेलं ‘ते’ नातं पोलिसांनी पुन्हा जोडलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये (Lockdown)
पती-पत्नीमध्ये वाद झाल्याच्या अनेक तक्रारी पुणे पोलिसांकडे (Pune Police) आल्या आहेत. पती-पत्नी बराचवेळ घरात एकत्र घरात असल्याने आणि बाहेर पडण्यास बंदी असल्याने त्यांच्या मध्ये शुल्लक कारणावरुन वाद होण्याच्या घटना घडल्या आहेत. अशीच एक घटना पुण्यात घडली होती. मात्र, पुणे पोलिसांनी पती-पत्नीचे तुटलेले नाते पुन्हा एकदा जुळवून आणले आहे.

 

पुण्यात राहणाऱ्या या दाम्पत्यामध्ये शुल्लक कारणावरुन वाद झाले. त्यावरुन त्यांनी थेट विभक्त होण्याचा निर्णय घेतला. एवढेच नाही तर या दोघांनी एकमेकांचे फोन नंबर ब्लॉक केले. त्यामुळे दोघांनाही एकमेकांशी संपर्क करता येत नव्हता. अखेर पतीने सामंजसपणा दाखवत पुढाकार घेतला आणि भरोसा सेलच्या मदतीने ते दोघे पुन्हा एकत्र राहु लागले. भरोसा सेलमुळे संसाराची विस्कटली जाणारी घडी पुन्हा एकदा बसली.

या दांपपत्याचे घरच्यांच्या सहमतीने लग्न झाले होते. सर्व काही सुरळीत सुरु असताना शुल्क कारणावरुन त्यांच्यामध्ये वाद झाले. पत्नी माहेरी निघून गेली. दोन्ही कुटुंबानी त्यांना पुन्हा एकत्र आणण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. वाद एवढा टोकाला गेला की, अखेर ते दोघे विभक्त होण्याच्या निर्णयापर्यंत पोहोचले. याच दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे कोणालाही बाहेर पडता आले नाही. सुरवातीला वर्क फ्रॉम होम असल्याने पतीला काही वाटले नाही, परंतु नंतर त्याला एकटेपणा जाणवू लागला.

नैराश्य आलेल्या पतीने लॉकडाऊन शिथिल होताच भरोसा सेलकडे धाव घेत घडलेला सर्व प्रकार सांगितला. मला माझ्या पत्नीसोबत एकत्र रहायचे आहे. काही तरी मार्ग काढा असा अर्ज पतीने केला. त्यावर भरोसा विभागामार्फत संबंधित महिलेशी संवाद साधला. दोघांमध्ये असलेला गैरसमज दूर करुन त्यांना पुन्हा एकदा एकत्र आणले. त्यांच्या संसाराची घडी विस्कटता विस्कटता रेशीमगाठी पुन्हा जुळवून आणण्यात भरोसा सेलला यश आले.