उपनिरीक्षकाच्या भाच्याचे वाचवले पुणे पोलिसांनी प्राण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई लाईन बॉयने स्पर्धा परिक्षेत यश येत नसल्याच्या नैराश्यातून आत्महत्येचा मॅसेज मित्रांना पाठविला अन पुणे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. पण, त्याच्या मोबाईलच्या लोकेशनवरून त्याचा शोध घेतला आणि आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले. त्याच्या कुटूंबियांनी पोलिसांचे आभार मानले.

याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणाचे पदवीपर्यंत शिक्षण पुर्ण झाले आहे. पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर त्याने पुण्यात येऊन स्पर्धा परिक्षेचा अभ्यास सुरू केला आहे. तो सध्या गोखलेनगर भागात राहण्यास आहे. दरम्यान, त्याचे वडिल मुंबई पोलीस दलात आहेत. तर, त्याचा मामा पोलीस उपनिरीक्षक आहे.

गेल्या काही वर्षांपासून स्पर्धा परिक्षेची तो तयारी करत होता. गोखलेनगरमध्ये तो मित्रांसोबत राहत होता. तर, लायब्ररी लावून तो अभ्यासही करत असे. मात्र, त्याला इतक्या वर्षानंतरही स्पर्धा परिक्षेत यश येत नव्हते. यामुळे तो नैराश्यात होता.

दरम्यान, दोन दिवसांपुर्वी त्याने अचानक त्याच्या मित्रांना व्हॉट्सअपवर आत्महत्या करत असल्याचा मॅसेज केला. त्यामुळे मित्र घाबरून गेले आणि त्यांनी तत्काळ शिवाजीनगर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बाळासाहेब कोपनर व पोलीस निरीक्षक (गुन्हे) तसेच काही कर्मचार्‍यांनी त्याचा शोध सुरू केला. त्यााने मेसेज केल्यानंतर मोबाईल बंद करून ठेवला होता. त्यामुळे त्याच्याशी संपर्कही होऊ शकत नव्हता. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन मिळवले. त्यावेळी ते फर्ग्युसन कॉलेजच्या पाठिमागील बाजूस असल्याचे समजले. यानंतर पोलिसांनी हा परिसर पिंजून काढला. यावेळी तो मिळून आला. त्याला विश्वासात घेऊन विचारले. त्यावेळी परिक्षेत नैराश्य येत असल्याने आत्महत्येसारखे पाऊल उचलत असल्याचे सांगितले. त्यानंतर वरिष्ठ निरीक्षक कोपनर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मनिषा झेंडे व त्यांच्या कर्मचार्‍यांनी या तरुणाचे मन परिवर्तन केले. त्याला समजावून सांगत त्याच्या मामाच्या ताब्यात दिले. त्यावेळी कुटूंबियांनी पुणे पोलिसांचे आभार मानले.

फेसबुक पेज लाईक करा –