इंडियन आयडॉल होण्याचे स्वप्न घेऊन मुंबईत आलेल्या तरुणाला पुणे पोलिसांची ‘साथ’

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – एक तरी जिवाभावाचा मित्र असावा असं म्हणतात. पण इंडियन आयडॉल होण्याचे स्वप्न घेऊन मुंबईत आलेल्या तरुणाला त्याच्या मित्रांनी लॉकडाऊन काळात घरातून बाहेर काढले आणि तो याकठीण परिस्थितीत हवालदिल झाला. पण त्याच्यासाठी पुणे पोलीस मित्र तर झालेच पण त्याला सर्वोत्तपरी मदत करत त्याला सुखरूप घरी देखील पाठविले. त्याने पुणे पोलिसांचे आभार मानले.

अंजुमन ईस्लाम (वय २२, रा. पश्चिम बंगाल) असे युवकाचे नाव आहे.

अस्लम मूळचा पश्चिम बंगालचा आहे. तो उत्तम गायक आहे. त्यामुळे तो इंडियन आयडॉल होण्यासाठी मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबईत होणाऱ्या ऑडिशनसाठी आला. मात्र, कोरोनाने देश लॉकडाऊन केला होता. यामुळे ऑडीशनची प्रक्रिया खोळांबली. अस्लम अतिशय गरीब कुटूंबातील आहे. तो येताना मोजकेच पैसे घेउन आला होता. पैसे संपल्यामुळे त्याची अडचण झाली होती. वारजेतील दांगट वस्तीवर राहणाऱ्या मित्राशी फोन करुन राहण्याची व्यवस्था केली. मात्र, लॉकडाऊन वाढतच गेले आणि त्या मित्राने अस्लमला घराबाहेर काढले. त्यामुळे तो पूर्ण हवालदिल झाला. तरीही तो घाबरला नाही. नव्या शहरात कोणीही ओळळीचे नसताना तो या संकटाला उभा राहून लढू लागला. अस्लम वारजे चौकातील तंबूमध्ये उदरनिर्वाह करीत राहत होता. वारजे पोलीस ठाण्याच्यावतीने केलेल्या अन्न वाटपात पोट भरत होता. एके दिवशी वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम वाहनातून जात असताना कोपऱ्यात अस्लम रडत असल्याचे दिसून आले. त्यांनी अस्लमकडे विचारणा केली. त्याने हकिकत सांगितली. अस्लम वारजे पोलिसांना मूळगावी जायची व्यवस्था करा अशी विनंती केली. त्यानुसार कदम यांनी कर्मचारी संतोष भापकर, सद्दाम तांबोळी, राहुल पाटील, प्रतिक काकडे यांना विशेष शाखेच्या कोट्यातून रेल्वेत एकसीट बुक करण्यास सांगितले. त्यानुसार कर्मचारी सीट बुक करुन अस्लमला प्रवासासाठी पैसे देउन मूळगावी पाठविले. पुणे पोलिसांना केलेल्या या मदतीने अस्लम भारावून गेला होता. त्याने पुणे पोलिसांचे भरल्या डोळ्यांनी आभार मानले.