वानवडीत दहशत पसरविणाऱ्या टोळीवर मोक्काची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –  किरकोळ भांडणाच्या कारणावरून पाठलाग करत गोळीबार करून दहशत पसरविणाऱ्या सराईत गुन्हेगार रिजवान उर्फ टिपू सत्तार पठाण याच्या टोळीतील १६ जणांवर पुणे पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम (मोक्का)नुसार कारवाई केला आहे.

रिजवान उर्फ टिपू सत्तार पठाण, अजिम उऱ्फ आंट्या महंमद शेख, एजाज सत्तार शेख, राजेश दिलीप पवार, सोहेल अनिस पठाण, सद्दाम सलीम पठाण, नदीम बाबर खान, मतिन हकीम सय्यद, इम्तीयाज खाजा पठाण, एजाज युसुफ इनामदार पटेल, अजिंक्य उर्फ चिंग्या बाळासाहेब उंद्रे, ऋषिकेश उर्फ ऋष्या अनिल सोनवणे, जैद कलीम बागवान, शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख, उबेद अन्सार खान अशी कारवाई कऱण्यात आलेल्यांची नावे आहेत.

रिजवान उर्फ टिपू सत्तार पठाण याच्या टोळीने किरकोळ भांडणावरून सय्यदनगर येथे ५ जानेवारी २०१९ रोजी निलेश बिनावत याच्या मोटारीचा पाठलाग करत गोळीबार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अधिनियमाच्या कलमांचा अंतर्भाव केला आहे.

लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने परिसरात शांतता राहावी यासाठी अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, परिमंडल पाचचे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील भोसले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) रावसाहेब भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली टोळीवर मोक्काची कारवाई करण्यात आली.