पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये ! गजा मारणेनंतर गँगस्टर शरद मोहोळवर मोठी कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना नियमांचे उल्लंघन करीत साथीदारांसह एका कार्यक्रमास उपस्थित राहताना, आरडाओरडा करत परिसरात दहशत निर्माण करणारा गँगस्टर शरद मोहोळ (वय 38, रा. सुतारदरा, कोथरूड) याला पुणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत प्रवेश करण्यास आणि वास्तव्यास दोन महिन्यांची मनाई करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिला आहे.

गुरुवार पेठ परिसरात 26 जानेवारीला एका संघटनेच्या कार्यक्रमाला गुंड शरद मोहोळ आणि त्याचे 10 ते 12 साथीदार आरडाओरडा करत हजर झाले होते. त्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित असलेले इतर नागरिक भीतीने पळून गेले होते. कोरोना कालावधीत नियमांचे पालन न करता मोहोळ टोळीने परिसरात दहशत निर्माण केली. त्यामुळे त्याच्यासह साथीदारांविरोधात खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून 16 जणांना अटक केली होती.

त्यांच्याविरोधात प्रतिबंधात्मक कारवाईचा आदेश खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे यांच्याकडे सादर केला होता. त्यानुसार गँगस्टर शरद मोहोळ याला शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत प्रवेश करणे आणि राहण्यावर दोन महिने सक्त मनाई करण्याचा आदेश 4 मार्च रोजी देण्यात आला होता.