सुधा भारद्वाज यांच्या अटकेसाठी पुणे पोलीस हरियाणात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कामगार नेत्या सुधा भारद्वाज यांना अटक करण्यासाठी पुणे पोलिसांचे पथक शुक्रवारी मध्यरात्री भारद्वाज यांच्या हरयाणातील फरिदाबाद येथील निवास्थानी दाखल झाले होते. भारद्वाज यांच्यावर नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप आहे. नियमानुसार महिलांना रात्री अटक करता येत नसल्याने पोलीस त्यांच्या निवासस्थानी रात्रभर थांबून होते. दरम्यान, भारद्वाज यांच्या वकील शालिनी गेरा यांनीही पुणे पोलीस अटकेच्या कारवाईसाठी आले असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पुणे पोलिसांसह हरयाणा पोलीसही तिथे उपस्थित होते.

गेल्या वर्षी ३१ डिसेंबर रोजी पुण्यातील शनिवारवाडयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेच्या आयोजनात नक्षलवादी संघटनांचा हात असल्याचे निष्पन्न झाले होते. या प्रकरणात यापूर्वी अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग, प्रा. सोमा सेन, महेश राऊत, सुधीर ढवळे, रोना विल्सन यांना अटक केली होती. नक्षलवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी अटक केलेले वेरनोन गोन्साल्विस, अ‍ॅड. सुधा भारद्वाज, अ‍ॅड. अरूण परेरा यांचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश के. डी. वडणे यांनी शुक्रवारी फेटाळून लावल्यानंतर पोलिसांच्या हालचाली वाढल्या आहेत. जामीन अर्ज फेटाळल्यानंतर बचाव पक्षाच्या वकिलांनी या निर्णयाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले. मात्र, जामीन फेटाळल्यानंतर लगोलग पुणे पोलिसांच्या पथकाने गोन्साल्विस आणि परेरा यांना अटक केली. तसेच पुणे पोलिसांचे एक पथक सुधा भारद्वाज यांच्या अटकेसाठी हरयाणातील फरिदाबाद येथील इरॉस गार्डन कॉलनीतील त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते.

सुधा भारद्वाज या आयआयटी कानपूरच्या १९७८ च्या बॅचच्या टॉपर आहेत.  त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण इंग्लंडमध्ये पूर्ण केले आहे. २०००मध्ये त्यांनी रायपूर येथील पंडित रविशंकर शुक्ला विद्यापिठातून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले आहे. दिवंगत कामगार नेते  शंकर गुहा नियोगी यांच्या कार्याने प्रभावित होऊन सुधा भारद्वाज या डाव्या चळवळीशी जोडल्या गेल्या. ३० वर्षांपासून सुधा भारद्वाज ट्रेड युनियनच्या नेत्या म्हणून काम करत आहेत. मानवाधिकार चळवळीतल्याही त्या महत्त्वाच्या नेत्या मानल्या जातात. छत्तीसगड पीपल्स यूनियन फॉर सिव्हिल लिबर्टिजच्या त्या सरचिटणीस असून, जनहित संघटनेच्या संस्थापक आहेत. सुधा भारद्वाज यांची आई कृष्णा भारद्वाज या जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाच्या डीन होत्या.