Pune : भाजी विक्रेत्यांना पोलिसांनी केली हात जोडून विनंती, म्हणाले – ‘आता तरी घरी जा’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना महामारीची ब्रेक द चैन यासाठी कडक निर्बंध केले आहेत. मात्र, फळ आणि भाजीविक्रेते रस्त्यावर व्यवसाय करीत आहेत. त्यासाठी वेळेचे बंधन शासनाने घालून दिले आहे. तरीसुद्धा रात्री सातनंतर सोलापूर रस्त्यावर हडपसरमध्ये भाजीविक्री करणाऱ्यांना आता तुम्ही घरी जावा, अशी हात जोडून विनंती पोलीस अधिकारी आणि कर्मचारी करीत होते.

पालिकेच्या अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांची सायंकाळी सहा वाजेपर्यंत भीती असते. ते रस्त्यावर थांबून भाजीविक्री करू देत नाहीत. लॉकडाऊनमुळे सायंकाळी सहानंतर खरेदीदार येत नाहीत, अशा कात्रीत भाजीविक्रेते सापडले आहेत. भाजीविक्रेते रस्त्यावर भाजीविक्री करण्यासाठी थांबतात, त्यामुळे पोलिसांनाच अखेर पुढाकार घेऊन त्यांना घरी जा, असे म्हणण्याची वेळ आली आहे. आता सातनंतर तुम्ही थांबला तरी खरेदीदार कोणी येणार नाही. कोरोनामुळे कडक निर्बंध जारी केले आहेत, असेही पोलिसांनी त्यांना सांगितले.

महापालिका प्रशासनानेच भाजीविक्रीसाठी नियोजन करून द्यावे, त्याप्रमाणे आम्ही भाजीविक्रीचा व्यवसाय करतो. मागिल वर्षापासून आम्हालासुद्धा कोरोनाची भीती वाटत आहे. मात्र, पोट स्वस्थ बसू देत नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी चार-पाचशे रुपयांचा भाजीपाला आणतो, त्यातून शंभर-दीडशे रुपये मिळतात, असे भाजीविक्री करणाऱ्या महिला केविलवाण्या सुरात सांगत होत्या. आता पालिकेनेच पुढाकार घेऊन भाजीपाला विक्रीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी. नोकरी नको व्यवसाय करा, असे केंद्र आणि राज्य शासन सांगत आहे. मात्र, व्यवसाय करणाऱ्यांना पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत, त्यामुळे व्यवसाय तरी कसा करायचा असा संतप्त सवाल किरकोळ भाजीविक्रेत्यांनी उपस्थित केला आहे.