पुणे पोलिसांकडून व्हर्चुअल अपॉइंटमेंट सुरू, नागरिक करू शकतात घर बसल्या तक्रार, जाणून घ्या

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पुणे पोलीसांनी कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर पुणेकरांसाठी एक स्तुत्य उपक्रम सुरू केला असून, त्यानुसार आता पुणेकरांना घरात बसून आपली तक्रार करता येणार आहे. व्ही अपॉइंटमेंट (व्हर्चुअल अपॉइंटमेंट) असे या उपक्रमाचे नाव असून, पुणे पोलिसांच्या वेबसाईटवर नोंदणी करायची आहे. यानंतर त्या नागरिकांना ऑनलाईन अपॉइंटमेंट दिली जाईल. त्यानंतर संबंधित पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडून ऑनलाईनरित्या व्हिडिओ कॉलिंगद्वारे नागरिकांच्या समस्याची सोडवणूक केली जाणार आहे. सध्या शहरातील पाच पोलिस ठाण्यात प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. याबाबतची सविस्तर माहिती सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली.

या उपक्रमाची माहिती त्यांनी व्हिडिओ कॉलिंगद्वारे झालेल्या पत्रकार परिषेदेत दिली. यावेळी ते बोलत होते. राज्यात टेक्नोसॅव्ही पोलिसांत पुणे पोलिसांचा पहिला क्रमांक आहे. त्यानुसारच आता पुणे पोलिसांनी लॉकडाऊननंतरच्या कालावधीत नागरिकांच्या तक्रारीची गैरसोय टाळण्यासाठी पुणे पोलिसांनी या उपक्रमाची सुरुवात केली आहे. पोलीस ठाण्यात गर्दी टाळली जावी आणि पुणेकरांना देखील त्याचा त्रास होऊ नये असे यामागचा उद्देश आहे. त्याचा पोलिसांसोबत पुणेकरांना फायदा होणार आहे. व्ही अपॉइंटमेंट उपक्रम राबविण्यासाठी पोलीस उपायुक्त डॉ. बच्चन सिंह व पोलीस उपनिरीक्षक कपील भालेराव यांनी काम केले आहे.

असा आहे उपक्रम
ज्या नागरिकाना तक्रार करायची आहे त्यांनी व्ही अपॉइंटमेंटद्वारे पोलिसांच्या वेबसाईटमध्ये तक्रारीची नोंद करायची आहे. ती केल्यानंतर त्यांना ई-मेलद्वारे पासवर्ड दिला जाईल. यानंतर एक ते दोन दिवसात पोलिसांचा त्या तक्रारदार व्यक्तीला पोलीस व्हिडिओ कॉलिंग करतील. तसेच त्यांची तक्रार एकूण घेऊन त्यावर कारवाई करण्यात येईल.

पाच पोलीस ठाण्यात उपक्रम सुरू…

शहरातील पाच पोलिस ठाण्यात प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम सुरू केला आहे. त्यात डेक्कन, लष्कर, कोथरुड, चतुःश्रृंगी आणि कोंढवा येथे सुविधा सुरू केली आहे. त्यानंतर काही दिवसांत उर्वरित सर्व पोलीस ठाणे आणि वाहतूक विभागात उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाचे सर्व रेकॉर्ड ठेवले जाणार आहेत. नागरिकांचे फीडबॅक देखील घेतले जाणार आहे. शहरातील सर्व नागरिकांनी सोशल डिस्टन्स पाळून तक्रार देण्यासाठी जास्तीत जास्त व्ही अपॉइंटमेंट ऑनलाईनचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

100 नंबरवर मिळेल तातडीची मदत
पुणेकरांना तात्काळ मदत हवी असल्यास त्यांनी 100 क्रमांकाला फोन करायचा आहे. त्यानुसार घटनास्थळी मदतीसाठी पोलीस दाखल होतील. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी व्ही अपॉइंटमेंट उपक्रम सुरु करण्यात आला आहे. मात्र, तातडीच्या मदतीसाठी पोलिस नियंत्रण कक्षला (१०० क्रमांक) संपर्क साधायचा आहे. त्यामुळे विविध घटनांवर तातडीने नियंत्रण मिळविण्यास मदत होणार आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like