‘पोलिसामागे पुणे पोलीस धावले ?’ पण…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवड पोलिसामागे पुणे पोलीस धावत असल्याचे पुणेकरांना पहायला मिळाले. पण त्याला पकडल्यानंतर तो तोतया पोलीस असल्याचे समोर आल्यानंतर पुणेकरांनी डोक्याला हात लावला.

त्याचे झाले असे, शुक्रवार पेठ पोलीस चौकीचे बीट मार्शल रात्री बुधवार पेठेत गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना पोलीस गणवेशातील एकजण दिसला. तो पोलीस म्हणून कर्मचारी त्याच्याकडे निघाले. पण झाले उलटेच तो त्यांना पाहून पळू लागला. मग संशय आल्याने त्यांनीही त्याचा पाठलाग सुरू केला. पोलीस पोलिसामागे धावत असल्याचे पाहून नागरिकही बुचकळ्यात पडले. त्याला काही अंतरावर पकडले, तर त्याच्या डोक्यावर पिंपरी-चिंचवड पोलीसांची टोपी आणि अंगात गणवेश देखील. त्याला विचारपूस केली असता त्याने आपण पोलीस नसल्याचे सांगितले.

देविदास लक्ष्मण आदक (वय 27, रा.दिघी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देविदास याला पोलीस दलात भरती व्हायचे होते. मात्र त्याचे हे स्वप्न पूर्ण झाले नाही. तो एका स्पर्धा परिक्षा केंद्रात मुलांना पोलीस भरतीचे फिजिकल ट्रेनिंगचे प्रशिक्षण देत होता. यावेळी त्याला येथील विद्यार्थी त्याला नेहमी तुम्ही पोलीस भरती का होत नाही ? असा प्रश्न विचारत होते. यामुळे त्याने बोगस पोलीस होण्याचा निर्णय घेतला, असे समोर आले आहे.

त्याला पकडल्यानंतर त्याबाबत कुटुंबाला माहिती देण्यात आली. परंतु, कुटुंबाला धक्काच बसला. कारण तो पिंपरी-चिंचवड पोलिसांमध्ये असल्याचे सांगत असे. विशेष म्हणजे, त्याने पोलीस असल्याचे सांगत विवाह केला. हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर सासरची मंडळींच्या पायाखालची वाळूच सरकली आहे. त्याला न्यायालयातून जामिन मिळताच पत्नी आणि नातेवाईकांनी न्यायालयाबाहेर चांगलाच चोप दिला.