शहरातील 8 पोलिस वसाहतीमध्ये फिरत्या (मोबाइल) कॅन्टीनची सुविधा सुरू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   पुणे पोलिसांनी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शहरातील 8 पोलिस वसाहतीमध्ये फिरत्या (मोबाइल) कॅन्टीनची सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे पोलिसांच्या कुटुंबियांना आता घरपोच धान्य व इतर गृहउपयोगी वस्तू मिळणार आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत जात आहे. तो रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि पोलिस दल 24 तास काम करत आहे. आतापर्यंत शहरातील कोरोना विरोधातील लढ्यात 91 पोलिसांना संसर्ग झाला आहे. तसेच, दोघांचा वीरमरण प्राप्त झाले आहे. त्यामुळे पोलिसांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून प्रशासनाकडून वेगवेगळे प्रयत्न केले जात आहे.

शहरात स्वारगेट, सोमवार पेठ, विश्रांतवाडी, खडक, खडकी, बॉडीगेट, भवानी पेठ आणि गोखलेनगर अशा 8 पोलिस वसाहती आहेत. याठिकाणी अनेक पोलीस राहतात. त्यांच्यासाठी ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. महिन्यातून 2 वेळा दुपारी साडेतीन ते सायंकाळी साडेपाच या काळात हे कॅन्टींन सुरू राहणार आहे.

वसाहतीमधील रहिवाशांना त्यांच्याकडे कधी फिरते कॅन्टींन येणार आहे. त्यासाठी नोटीस बोर्डवर त्याची ठळकपणे नोंद करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्याबरोबरच शिवाजीनगर पोलिस मुख्यालयातील मुख्य कॅन्टीन देखील रविवार सोडून सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत सुरू राहणार आहे. पोलिस ठाण्यात असताना व बंदोबस्तावर असताना कशी काळजी घ्यावी, याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. पोलिसांबरोबरच त्यांच्या कुटुंयांची देखील काळजी पोलिस दलाकडून घेतली जात आहे. पोलिसांसाठी खास रुग्णालय देखील राखीव ठेवण्यात आली आहे.

शिवाजीनगर पोलिस मुख्यालयातील सुविधा केंद्रात पोलिसांसाठी एक कॅन्टीन आहे. या ठिकाणाहून पोलिस कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय धान्य, गृहउपयोगी वस्तू घेऊन जातात. पण, गेल्या काही दिवसांपासून या कॅन्टीन मध्ये मोठी गर्दी होऊ लागली आहे. कोरोनाच्या काळात त्या ठिकाण गर्दी होऊ नये. त्यामुळे ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.