पुण्यात सहायक पोलीस फौजदाराला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईन – रस्त्यामध्ये आरडाओरड करणाऱ्या व्यक्तीला समजावून सांगण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात आली. ही घटना शुक्रवारी (दि.२८) रात्री साडेबाराच्या सुमारास मंगळवार पेठेतील नरपतगिरी चौकातील रॉयल मोटर्स समोर घडली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

ओमगिरी शामराव गोसावी (वय – ३२ रा. करंडे चौक, रास्ता पेठ, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस फौजदार शेटीबा बाबुराव शिंदे (वय – ५५) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रॉयल मोटर्स समोर दगड टाकण्याचे काम सुरु होते.

याच कारवरुन आरोपी त्या ठिकाणी काम करणाऱ्यांना मोठमोठ्याने शिविगाळ करुन आरडाओरड करत होता. समर्थ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस फौजदार शेटीबा शिंदे, पोलीस शिपाई कोतलापुरे, घनवट आणि पवार हे चौकामध्ये कर्तव्य बजावत होते. आरोपीचा आरडा ओरडा ऐकून ते त्या ठिकाणी गेले. त्यांनी आरोपीला शांत बसण्यास सांगितले असता त्याने शेटीबा शिंदे आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करुन धमकी दिली. तसेच शिंदे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पोलिसांनी आरोपीला अटक करुन पोलीस ठाण्यात आणले. त्याच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुढील तपास समर्थ पोलीस करीत आहेत.

दोन दिवसांपूर्वी येरवडा येथील पर्णकुटी पोलीस चौकीत पोलिसांना दोन सामाजिक कर्यकर्त्यांकडून धमकी देण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच काल रात्री सहायक पोलीस फौजदाराला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. पोलिसांवर हल्ले होण्याचे प्रमाण पुणे तसेच परसिरात वाढत आहे. पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येते. मात्र, त्यांच्यावर कडक कारवाई होऊन त्यांना शिक्षा झाली पाहिजे असे मत व्यक्त करण्यात येत आहे.