पुणे पोलिसांचा ‘या’ गोष्टींसाठी 14 दिवस प्रतिबंधात्मक आदेश जारी !

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शहरातील सार्वजनिक कार्यक्रम, सभा, मोर्चा, निदर्शने, आंदोलनांवर घातलेली बंदी पुणे पोलिसांनी कायम ठेवली आहे. शहरात पुढील 14 दिवस प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशाचे पालन न केल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

शहरात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. तर येत्या शुक्रवारी (३१ जुलै) छत्रपती राजाराम जयंती आहे. तर शनिवारी (१ ऑगस्ट) लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तसेच बकरी ईद आहे. ३ ऑगस्ट रोजी राखी पौर्णिमा आणि ९ ऑगस्ट रोजी क्रांतीदिन आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तसेच कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलमांन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. आदेशाचे पालन न केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा सहपोलीस आयुक्त डॉ. शिसवे यांनी दिला आहे.

या काळात घोषणाबाजी, सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यास मनाई असून हे प्रतिबंधात्मक आदेश १० ऑगस्टपर्यंत कायम राहणार आहेत. मिरवणूका काढण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. राज्यात ३१ जुलैपर्यंत टाळेबंदी कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक गर्दी करू नये तसेच पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.