पुण्यातील संचारबंदी बाबत पोलिसांनी लोकांचा केला संभ्रम दूर; शनिवार आणि रविवारच्या Lockdown बाबत महापालिका प्रशासनाची चर्चा करुन निर्णय घेतला जाईल ! सह आयुक्त डॉ. शिसवे म्हणाले – ‘पुण्यात…’, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात सायंकाळी 6 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान सलग 12 तास संचारबंदीची अंमलबजावणी शनिवारी (दि.3 एप्रिल) रात्रीपासून सुरु झाली आहे. दरम्यान, आज (रविवार) राज्य शासनाने संपूर्ण राज्यात रात्री 8 ते सकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान संचारबंदी लावण्याची घोषणा केली. त्यामुळे शहर व जिल्ह्यात यापूर्वीच लागू केलेल्या संचारबंदीच्या वेळेत बदल होणार का याबद्दल लोकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. याबाबत पोलीस सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सध्या तरी शहरात सायंकाळी 6 ते सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान संचारबंदी कायम राहणार आहे. कदाचित ती सकाळी ७ वाजेपर्यंत वाढू शकेल असे सांगितले आहे.

सरकारने शनिवार व रविवारी संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्याबाबत महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि पोलीस प्रशासन हे चर्चा करुन त्याबाबतचे अतिरिक्त आदेश काढणार आहेत. सूत्रांच्या
माहितीनुसार पुण्यात देखील शनिवार आणि रविवार Lockdown असणार आहे.

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्यामुळे शनिवारपासून शहर व जिल्ह्यात सायंकाळी 6 ते सकाळी 6 दरम्यान संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या आजच्या घोषणेप्रमाणे या वेळेत सध्या तरी बदल होण्याची शक्यता नसल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत शासनाचे लेखी आदेश आल्यानंतर त्यावर चर्चा करुन पुढील आवश्यक ते बदल करण्याची येणार आहे. मात्र, सायंकाळी 6 नंतरची संचारबंदी कायम राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

पुण्यात काेरोनाचा प्रादुर्भाव सर्वाधिक असल्याने सध्या तरी सायंकाळी 6 पासून संचारबंदीची अंमलबजावणी सुरुच राहणार आहे. शनिवार आणि रविवारच्या लॉकडाऊनबाबत महापालिका प्रशासनाची चर्चा करुन निर्णय घेतला जाईल.

डॉ. रवींद्र शिसवे (सह पोलीस आयुक्त, पुणे शहर)