नारायणगावात सेक्स रॅकेटचा फर्दाफाश; दोन महिलांना घेतले ताब्यात, लॉजमालकासह तिघांवर FIR दाखल

जुन्नर : पोलीसनामा ऑनलाइन –    पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव येथील एसटी स्थानकासमोरील विश्वनाथ लॉजवर छापा टाकून पोलिसांनी वेश्या व्यवसाय चालकावर गुन्हा दाखल केला आहे, तर दोन पीडित महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणी आरोपी अशोक हृदयनारायण तिवारी, गौरव अशोक तिवारी (रा. विश्वनाथ लॉज नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे) व कैलास नामदेव वाबळे (रा. वडगाव सहाणी, ता. जुन्नर, जि. पुणे) यांच्याविरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल योगेश दामोदर गारगोटे यांनी फिर्याद दिली असून, त्यांच्यावर पिटा व प्रचलित कायद्यान्वये तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नारायणगावातील विश्वनाथ लॉज येथे लॉज चालक अशोक हृदयनारायण तिवारी, गौरव अशोक तिवारी व कैलास नामदेव वाबळे हे एकमेकांच्या मदतीने वेश्याव्यवसाय चालवतात. याची माहिती नाारायणगावचे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे यांना माहिती दिली होती. त्यानुसार उपविभागीय अधिकारी जावळे यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत सदर ठिकाणी छापा टाकला. बनावट ग्राहक पाठवून वेश्याव्यवसायासाठी मुलीची मागणी केली. त्याप्रमाणे कैलास वाबळे यांनी वेश्या गमनासाठी महिला पुरवून त्यांच्याकडून लॉजचे चालक अशोक तिवारी, गौरव तिवारी यांनी एक हजार रुपये रोख रक्कम स्वीकारल्याचे लक्षात येताच पोलिसांनी छापा टाकून वेश्याव्यवसाय करणा-या दोन पीडित महिलांना ताब्यात घेतले आहे. तसेच लॉजचे चालक अशोक तिवारी , गौरव तिवारी यांना ताब्यात घेतले आहे.