पुण्यातील सोमवार पेठेत मास्कचा साठा पकडला, भुपेश गुप्ता आणि रोहन शुक्लावर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील मध्यवस्तीत फ्लॅटमध्ये साठवणूक करण्यात आलेला मास्कच्या साठ्यावर पुणे पोलिसांनी छापा टाकून पर्दाफाश केला. येथून सव्वा चार लाखांचे मास्क जप्त करण्यात आले आहेत. चढ्या दराने त्याची विक्री करण्यात येत होती.

याप्रकरणी भुपेश ओमप्रकाश गुप्ता आणि रोहन अजय शुक्ला (रा. दोघेही पिंगलेवस्ती, मुंढवा रोड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत उपनिरीक्षक हनुमंत शिंदे यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना आजारानंतर सर्वांनाच बचावासाठी तोंडाला रुमाल किंवा मास्क लावण्यास आणि हात साबण किंवा सॅनीटायझरने धुण्यास सांगण्यात आले. यानंतर राज्यात सॅनीटायझर आणि मास्कचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू झाला. अनेकांनी चढ्या भावाने विक्री केली. तर बनावट वस्तू तयारकरून त्याची विक्री करण्यात येत होती. गेल्याच आठवड्यात पोलिसांनी सॅनीटायझरचा मोठा साठा पकडला. यानंतर याची माहिती घेण्यात येत असताना गुन्हे शाखेच्या युनिट एकला सोमवार पेठेतील लडकत पेट्रोल पंपासमोर एका इमारतीत मास्कचा साठाकरून ठेवण्यात आला आहे. तसेच त्याची चढ्या दराने विक्री करत असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी याठिकाणी छापा टाकला. त्यावेळी एन-90 तसेच आयएसआय मार्क असणारे वेगवेगळे असे एकूण 4 लाख 30 हजार रुपयांचे मास्क जप्त करण्यात आले.

लिंक एन्टरप्रायजेस नावाने भुपेश चालवत होता. तर त्याठिकाणी रोहन हा ऑफिस बॉय म्हणून कामास होता.