Lockdown : पुण्यात ‘लॉकडाऊन’मध्ये हॉटेलमधूनच दारुची ‘विक्री’, कोरेगाव पार्क येथून 9 लाखांचा माल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरेगाव पार्क येथील सतरंज रेस्टो अँड बार येथे लॉकडाऊनच्या काळात चोरुन दारु विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खंडणीविरोधी पथकाने छापा घालून तेथील ८ लाख ८४ हजार ९१५ रुपयांच्या देशी विदेशी मद्य व बियर जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांना कोरेगाव पार्क येथील सतरंज रेस्टो अँड बारमध्ये चोरुन दारुची विक्री सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार यांच्या उपस्थितीत खंडणी विरोधी पथकाने खात्री करुन घेतली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते, उपनिरीक्षक निलेशकुमार महाडिक, हवालदार मगर, चिखले, बागवान यांच्यासह राज्य उत्पादन शुल्क खात्याचे सहायक आयुक्त संजय पाटील यांच्यासमवेत सतरंज रेस्टो अँड बारवर छापा घातला. तेथील कलीमउद्दीन रियाजुद्दीन शेख (रा. लेन नंबर ४, कोरेगाव पार्क) याला ताब्यात घेतले आहे. या हॉटेलमध्ये १ लाख २२ हजार १७१ रुपयांच्या २९ वेगवेगळ्या कंपन्यांच्या दारुच्या बादल्या व बियर बादल्या आढळून आल्या.

त्याच्याकडे चौकशी केल्यावर हॉटेल परिसरात दारुचा साठा असलेले एक गोदाम आढळून आले. या गोदामात ७ लाख ६२ हजार ७४४ रुपयांची दारु आढळून आली. हॉटेल सुरु ठेवण्यास बंदी असताना ते चालू ठेवून बेकादेशीरपणे दारु विक्री केल्याबद्दल कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.