पुण्यात गायछाप अन् सिगारेटची विक्री करणार्‍या दुकानावर छापा, सव्वा लाखाचा माल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  चतुःश्रुगी भागातील वडारवाडी भागात गायछाप आणि सिगारेटची बेकायदा विक्री करणाऱ्या एका किराणा दुकानावर सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. येथून सव्वा लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे. मदनलाल चेनाराम बोरानाक व रमेश चेनाराम बोराना (रा. वडारवाडी) याच्यावर चतुःश्रुगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर पान टपऱ्या बंद झाल्या आहेत. अद्याप देखील त्या उघडल्या नाहीत. त्यामुळे धूम्रपान करणारे आणि तंबाखू खाणाऱ्यांचे हाल झाले आहेत. अशा वेळी ते मिळेल त्या किमतीत घेऊन आपली हाऊस भागवत आहेत. मात्र याचा फायदा घेऊन काही किराणा दुकानदार चढ्या दराने याची विक्री करत आहेत. त्यामुळे पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे.

दरम्यान सामाजिक सुरक्षा विभागाला चतुःश्रुगी परिसरात गस्त घालत असताना बालाजी मिनी मार्केट या दुकानात तंबाखू व सिगारेटची चढ्या दराने विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यावेळी याची खातरजमा करण्यासाठी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. त्यानंतर सहायक पोलिस आयुक्त विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक वैशाली चांदगुडे, उपनिरीक्षक प्रिया टिळेकर, महिला कर्मचारी राज्यश्री मोहिते, संतोष भांडवलकर, हनुमंत कांबळे यांच्या पथकाने याठिकाणी छापा टाकला. यावेळी गायछाप, सिगारेट असा एकूण 1 लाख 33 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.