गाईच्या तुपात भेसळ करणाऱ्या गोडावूनवर पुणे पोलिसांचा छापा

पुणे  : पोलीसनामा ऑनलाईन -दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेवला असताना भारती विद्यापीठ पोलिसांनी गाईच्या तुपात भेसळ करणाऱ्या गोडावूनवर छापा टाकून ४१२ किलो भेसळयुक्त तुप जप्त केले. ही कारवाई बुधवारी (दि.२४) रात्री सव्वादहाच्या सुमारास गंगाधाम चौकातील एका गोडावुनमध्ये करण्यात आली. या कारवाईत केशरसिंग मानसिंग राठोड (वय-४० रा. अप्पर इंदिरानगर, पुणे) याला ताब्यात घेण्यात आले आहे.

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई गणेश चिंचकर यांना एक व्यक्ती कात्रज चौकात अॅक्टीव्हा (एमएच १२ पीके ३८२१) गाडीवरुन गाईचे भेसयुक्त तुप विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी कात्रज चौकात सापळा रचून केशरसिंग राठोड याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १५ किलो वजनाचा खाद्यतुपाचा डबा जप्त करण्यात आला. त्याच्यकडे केलेल्या चौकशीत त्याने गायीच्या तुपामध्ये तेल व डालडा घालून भेसळ करुन त्याची विक्री करीत असल्याची माहिती दिली. तसेच हि भेसळ गंगाधाम चौकातील एका गोडावुनमध्ये करीत असल्याची कबुली दिली.

भारती विद्यापीठ पोलिसांनी याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) अधिकाऱ्यांना दिली. एफडीए अधिकारी पी.पी. गुंजाळ आणि भांबरे यांच्यासह पोलिसांनी गंगाधाम चौकातील न्यु इरा सोसायटी मधील नोबेल एक्सेलन्सी या इमारतीमधील गोडावुनमध्ये छापा टाकला. त्यावेळी गोडावुनमध्ये भेसळ असलेले गायीच्या तुपाचे २५ डबे, भेसळ करण्याकरीता दोन ६० किलोचे गायीचे पिवळे तुप उघड्या स्थितीत आढळून आले. अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी गोडावुनमधील १ लाख ५० हजार ६० रुपयांचे ४१२ किलो भेसळयुक्त तुप जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेल्या तुपाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

ही कारावीई परिमंडळ -२ चे पोलीस उपायुक्त बच्चन सिंग, सहायक पोलीस आयुक्त रविद्र रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विष्णु ताम्हाणे, सहायक पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी, सहायक पोलीस निरीक्षक उमरे, तपास पथकाचे कर्मचारी चंद्रकांत फडतरे, कृष्णा बढे, सर्फराज देशमुख, सचिन पवार, गणेश चिंचकर, महेश मंडलिक, राहुल तांबे, कुंदन शिंदे, अभिजीत रत्नपारखी यांच्या पथकाने केली.